नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत वाढत्या संसर्गाच्या परिस्थितीत दिलासादायक आकडेवारी समोर आली आहे. कोरोनाच्या नव्या रुग्णांच्या दैनंदिन संख्येत काही प्रमाणात घट झाली असून एका दिवसात अडीच लाखांहून रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर २७७१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, मंगळवारी देशभरात कोरोनाचे ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण आढळले असून २ लाख ५२ हजार रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी मनोधैर्य उंचावणारी आहे. भारतात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या १ कोटी ७६ लाख ३५ हजार ३०७वर पोहोचली असून देशात आता २८ लाख ८२ हजार २०४ सक्रिय रुग्ण आहेत. तर एकूण १ कोटी ४५ लाख ५६ हजार ३०७ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
सध्या देशात रुग्ण बरे होण्याचा दर ८२.५४ टक्क्यांवर आला आहे. हाच दर १७ फेब्रुवारीला ९७.३३ टक्के होता. देशात एकूण १ लाख ९७ हजार ८९४ जणांचा मृत्यू झाला असून मृत्युदर काही प्रमाणात घटून १.१२ टक्के झाला आहे. एकूण मृतकांमध्ये ७० रुग्णांचा मृत्यू इतर आजारांमुळे ग्रस्त असल्यामुळे झाल्याचे आरोग्य मंत्रालयाने सांगितले आहे.
३८ टक्के रुग्ण भारतात
एकीकडे रुग्णसंख्येत काही प्रमाणात घट झाल्यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, दुसरीकडे भारतातील वाढलेल्या रुग्णसंख्येने जगाची चिंता वाढली आहे. जगभरातील कोरोनाच्या दैनंदिन रुग्णांपैकी ३८ टक्के रुग्ण भारतात आहेत. त्यामुळे एखाद्या देशाचा हा सर्वाधिक वाटा ठरला आहे. महिनाभरापूर्वी हा आकडा केवळ ९ टक्के होता. गेल्या दीड महिन्यांत देशातील रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ झाली आहे. n भारतात कोरोनाची एकूण रुग्णसंख्या सुमारे पावणेदोन कोटी एवढी आहे. एकूण पॉझिटिव्हिटी दर हा २५ टक्के आहे. हाच दर अमेरिकेत ७ टक्क्यांपर्यंत घसरला आहे.