नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांचा आकडा 1,73,13,163 वर पोहोचला आहे. तर कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,95,123 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क, सोशल डिस्टंसिंग, क्वारंटाईन, होम आयसोलेशनच्या माध्यमातून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाच्या संकटात लॉकडाऊनमुळे अनेकांचे विवाह लांबणीवर गेले आहेत. मात्र याच दरम्यान एका अनोख्या लग्नाची गोष्ट समोर आली असून सर्वत्र याच लग्नाची चर्चा रंगली आहे.
उत्तर प्रदेशातील काशीमध्ये कोरोना नियमावलीचं पालन करून एका अनोख्या पद्धतीने विवाह सोहळा पार पडला आहे. लग्नात आलेल्या पाहुण्याचं स्वागत हे नेहमीप्रमाणे कोल्ड्रींक्स देऊन न करता काढा देऊन करण्यात आले आहे. एवढंच नव्हे, तर लग्नात आलेल्या सर्व पाहुण्यांना कोरोना संक्रमण टाळण्यासाठी भेट म्हणून मास्क दिला आहे. दरम्यान सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांच पालन करण्यासाठी वऱ्हाडी मंडळींनी दोन लोकांमध्ये सुरक्षित अंतर ठेवून डान्स देखील केला आहे. या अनोख्या लग्नाची सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, काशी येथे राहणारे हरतलाल चौरसिया यांच्या मुलाचा विवाहसोहळा हा अत्यंत साध्या पद्धतीने कोरोन नियमांचं पालन करून करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती खबरदारी घेण्यात आली होती. मास्क आणि सॅनिटाझरचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे लग्नासाठी आलेल्या पाहुण्यांना कोल्ड्रींक्स ऐवजी शरीरासाठी गुणकारी असणारा असा काढा देण्यात आला. तसेच भेट म्हणून मास्कच वाटप करण्यात आलं आहे.
हरत लाल चौरसिया यांनी कोरोना संसर्ग लक्षात घेता कोल्ड्रींक्सच्या जागी काढा ठेवण्यात आला होता. तसेच कोणत्याही पाहुण्यांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून विशेष व्यवस्था करण्यात आली होती असं म्हटलं आहे. गेल्या वर्षी आपल्या मुलाचं लग्न ठरवण्यात आलं होतं. पण देशातील लॉकडाऊनमुळे ते होऊ शकलं नाही. त्यामुळे आता कोरोनाचे सर्व नियम पाळून हा विवाहसोहळा पार पाडला असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. लग्नात आलेल्या पाहुण्यांना देखील लग्नाची ही नवीन पद्धत फारच आवडली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.