नवी दिल्ली : घराबाहेर जाताना मास्क वापरता तसेच आता घरात असतानाही मास्क घाला. आवश्यकता असेल तर घराबाहेर कामासाठी जा, अन्यथा घरातच राहा. सध्या कोणाही पाहुण्यांना घरी बोलावू नका, असे नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल यांनी सोमवारी एका पत्रकार परिषदेत सांगितले. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागरिकांनी पूर्वीपेक्षा अधिक दक्षता बाळगायला हवी, असे ते म्हणाले.
डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, जर एखाद्या घरात कोरोना रुग्ण घरातच विलगीकरणात असेल तर त्याने सतत मास्क घालणे आवश्यक आहे. त्याने असे न केल्यास त्या घरातील इतर लोकांनाही या विषाणूचा संसर्ग होण्याची भीती आहे. एखाद्या घरात कोरोनाचा संसर्ग झालेला असो वा नसो, घरातही प्रत्येक व्यक्तीने मास्क घालून वावरणे आवश्यक बनले आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, मास्क न घातलेल्या व्यक्ती समोरासमोर आल्या व त्यातील एक व्यक्ती कोरोनाबाधित असेल, तर त्यामुळे दुसऱ्याला संसर्ग होण्याची ९० टक्के शक्यता असते. एखादा कोरोना रुग्ण महिनाभरामध्ये ४६० लोकांना बाधित करू शकतो.
लक्षणे दिसल्यास विलगीकरणात जावेडॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, आरटीपीसीरचा अहवाल एखाद्या वेळी निगेटिव्हही येऊ शकतो. त्यामुळे कोरोनासदृश्य लक्षणे जाणवत असल्यास अहवालाची वाट न पाहता त्वरित विलगीकरणात जावे.