नवी दिल्ली - देशात कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनामुळे अनेकांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अशीच एक मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मुलीच्या वाढदिवशीच एका आईने जगाचा निरोप घेतला. नम्रता जैन असं या आईचं नाव असून ती ग्वाल्हेरमध्ये राहत होती. नम्रता मृत्यूशी झुंज देत असताना आपली लेक मान्यासाठी तडफडत होती. पण मान्या आली नाही अन् नम्रताला मृत्यूने गाठलं. 33 वर्षीय नम्रता जैन हिला कोरोनाची लागण झाली असून आपल्या मुलीची आठवत काढत तिने अखेरचा श्वास घेतल्याचं समोर आलं आहे.
नम्रताच्या दत्तक मुलीचा दुसरा वाढदिवस होता. दुर्दैवाने त्याच दिवशी तिचं निधन झाले. नम्रता ही कॅन्सरची रुग्ण होती. फुफ्फुसात पाणी झाल्यानंतर तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आली. नम्रताला स्वत:च मूल नव्हतं म्हणून दीड वर्षांपूर्वी स्वत:च्या बहिणीकडून 24 दिवसांची मुलगी दत्तक घेतली होती. अचानक डिसेंबरमध्ये बहीण आली आणि मुलीच्या अपहरणाचा आरोप लावत मुलीला घेऊन गेली. तेव्हापासून नम्रता तणावात होती. डीडी नगर निवासी नम्रताचा पती शशिकांत जैनने मृत्यूच्या दोन दिवसांपूर्वी नम्रताला सुपर स्पेशालिटी रुग्णालयात भरती केलं होतं.
शशिकांतने दिलेल्या माहितीनुसार, 24 जानेवारी रोजी नम्रताची तब्येत खूप जास्त बिघडली. याच दिवशी मान्याचा वाढदिवस होता. ती सतत तिची आठवण काढत होती. रात्री 12.30 अचानक तिने बोलणं बंद केलं. ती शांत झाली होती. शशिकांतने सांगितलं की, नम्रताची मानलेली बहीण अंजलीकडून दोन वर्षांपूर्वी सहारनपूरमध्ये भेट झाली होती. तेथे जैन समाजाचा एक कार्यक्रम सुरू होता. बऱ्याच दिवसांनंतर ही भेट झाली होती. अंजली गर्भवती होती. तिला आधीच दोन मुली होत्या. बोलता बोलता नम्रताला बाळ दत्तक घ्यायचं असल्याचं समोर आलं. यावेळी अंजलीने तिसरी मुलगी दत्तक देण्याचं वचन दिलं.
अंजलीची तिसरी मुलगी 24 दिवसांची होती, तेव्हा 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर कायदेशीर कारवाई करीत मुलीला दत्तक घेतलं. आम्ही तिचं नाव मान्या ठेवलं. मान्याचा पहिला वाढदिवस धुमधडाक्यात साजरा केला. मुलगी दीड वर्षाची झाल्यावर तिच्या बहिणीने मुलगी परत मागायला सुरुवात केली. त्यांनी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. 8 डिसेंबर 2021 रोजी अंजली पोलिसांसह आली आणि मुलीला जबरदस्तीने घेऊन गेली. यानंतर नम्रता तुटून गेली. आणि यानंतर ती आजारी राहू लागली. नम्रतालादेखील ती लहान असताना एका नातेवाईकांकडून दत्तक घेण्यात आल्याचं तिच्या पतीने सांगितलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.