नवी दिल्ली : देशात पहिल्यांदाच एकाच दिवसात कोरोनाचे ४० हजारहून अधिक नवे रुग्ण सोमवारी आढळून आले आले आहेत. त्यामुळे या आजाराच्या रुग्णांचा एकूण आकडा आता ११ लाखांहून अधिक झाला आहे. मात्र या आजारातून बरे होणाऱ्यांची संख्याही ७ लाखांहून जास्त झाल्याने सर्वांनाच मोठा दिलासा मिळाला आहे.
केंद्रीय आरोग्य खात्याने सांगितले की, देशात सोमवारी कोरोनामुळे आणखी ६८१ लोकांचा मृत्यू झाल्याने एकूण बळींची संख्या २७,४९७ झाली आहे. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या आता ११,१८,०४३ इतकी झाली आहे. तीनच दिवसांपूर्वी देशातील रुग्णसंख्येने १० लाखांचा टप्पा ओलांडला होता. सध्या ३,९०,४५९ रुग्णांवर उपचार सुरू असून कोरोनातून पूर्णपणे बरे झालेल्यांची संख्या आता ७,००,०८६ झाली आहे. एकूण रुग्णांपैकी बरे झालेल्यांचे प्रमाण ६२.६१ टक्के इतके आहे.देशाचा मृत्यूदर पाच महिन्यांत पहिल्यांदाच २.५ टक्क्यांहून कमी झाला आहे.
3,10,455
महाराष्ट्रामध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. तामिळनाडूमध्ये १,७०,६९३, दिल्लीत १,२२,७९३, कर्नाटकमध्ये ६३,७७२, गुजरातमध्ये ४८,३५५, उत्तर प्रदेशमध्ये ४९,६५०, तेलंगणामध्ये ४५,०७६ इतके कोरोना रुग्ण आहेत.
11,854
देशातील सर्वाधिक रुग्ण व बळी हे महाराष्ट्रात आहेत. देशातील २७,४९७ कोरोना बळींमध्ये महाराष्ट्रातील ११,८५४, दिल्लीतील ३२६८, तामिळनाडूमधील २,४८१, गुजरातमधील २१४२, कर्नाटकमधील १३३१, उत्तर प्रदेशमधील १,१४६, पश्चिम बंगालमधील १,११२, मध्य प्रदेशमधील ७२१ व आंध्र प्रदेशमधील ६४२ जणांचा समावेश आहे. अन्य राज्यांतही लक्षणीय प्रमाणात बळी गेले आहेत. एकूण बळींतील ७० टक्के लोक एकाहून अधिक व्याधीने ग्रस्त होते.