नवी दिल्ली : चीनच्याकोरोनाग्रस्त वुहान शहरातून आणखी ३२३ भारतीय नागरिकांना घेऊन एअर इंडियाचे विमान रविवारी सकाळी दिल्ली विमानतळावर दाखल झाले असले तरी या प्रवाशांबरोबर दोन मराठी विद्यार्थ्यांनी येण्यास नकार दिला असून, यासाठी त्यांनी आर्थिक स्थितीचे कारण पुढे केले आहे. दरम्यान, हे विमान मालदीवच्या सात लोकांनाही वुहानहून घेऊन आले आहे.
अनेक जण चीनमधूनकोरोनाच्या भीतीने देश सोडत असताना वुहान युनिर्व्हसिटी ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीमध्ये पीएच. डी. करीत असलेले गिरीश पाटील (२९) व चंद्रदीप जाधव (२९) हे पैशाच्या कमतरतेमुळे तेथेच राहिले आहेत. भारतात अनेक आजार पाहिले आहेत. आम्हाला कोरोनाची भीती नाही, असेही त्यांचे म्हणणे आहे. गिरीश पाटील याने सांगितले की, आम्ही मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेलो आहोत. आम्ही आता भारतात गेलो तर स्वत:च्या पैशाने आम्हाला चीनमध्ये परत यावे लागेल.
आम्हाला मिळणाऱ्या स्कॉलरशीपने आम्ही आमच्या कुटुंबाची मदत करतो. आमचे कुटुंब गरीब आहे व ते आमच्यावरच अवलंबून आहे. आम्ही प्रवासावर खर्च करू शकत नाहीत.यातील गिरीश पाटील धुळ्याचा असल्याचे सांगितले जाते मात्र, त्याची पुष्टी होऊ शकली नाही. या दोघांच्या बरोबरचे सर्व विद्यार्थी परतले आहेत. गिरीश पाटीलने सांगितले की, आम्ही येथेच ठीक आहोत. दूतावासाचे अधिकारी मॅसेजिंग अॅपच्या माध्यमातून आमच्या संपर्कात आहेत. चंद्रदीप जाधवने सांगितले की, विद्यापीठाने आम्हाला एक इंडक्शन कुकर व मायक्रोवेव्ह ओव्हन दिले आहे. आम्ही चार तासांसाठी बाहेरही जाऊ शकतो.
केरळात कोरोनाचा आणखी एक रुग्ण
केरळातील त्रिशूरमध्ये एका विद्यार्थ्यास हा संसर्ग झाल्याचे काही दिवसांपूर्वीच स्पष्ट झाले होते. आता केरळातच दुसरे प्रकरण समोर आले आहे. ही व्यक्तीही चीनहून परतलेली आहे. केरळ सरकारने सांगितले की, पुण्याच्या राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेच्या अहवालाची आम्ही वाट पहात आहोत. आरोग्यमंत्री के. के. शैलेजा म्हणाल्या की, आम्हाला एनआयव्हीने सांगितले आहे की, या व्यक्तीला कोरोना संसर्ग झालेला असू शकतो.
विमानातच स्कॅनिंगची मागणी
मुंबई : प्रवाशांचे थर्मल स्कॅनिंग टर्मिनल इमारतींमध्ये करण्याऐवजी थेट विमानात करण्यात यावी, अशी मागणी या क्षेत्रातील जाणकारांकडून होत आहे.कोरोना व्हायरसग्रस्त प्रवासी टर्मिनल इमारतीपर्यंत विनातपासणी येत असल्याने इतरांना त्याची बाधा होण्याची भीती व्यक्त करून स्कॅनिंग विमानातच करण्याची मागणी होत आहे.
अधिकाऱ्यांनी सांगितले की, यापूर्वी एअर इंडियाचे एक विशेष विमान शनिवारी ३२४ भारतीय नागरिकांना घेऊन दिल्लीत आले होते. सैन्य आणि आयटीबीपीने बनविलेल्या दोन केंद्रात त्यांना भरती करण्यात आले आहे. अर्थात, तपासणीत कोणीही कोरोना संसर्ग असलेले आढळले नाही. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी रविवारी टष्ट्वीट केले की, आज एअर इंडियाचे दुसरे विमान ३२३ भारतीय नागरिकांना घेऊन वुहानमधून दाखल झाले आहे. कोरोना विषाणूंच्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर इंडिगोने भारत आणि चीनमधील आपले सर्व तीनही उड्डाणे रद्द केली आहेत. दिल्ली-शांघाई उड्डाण रद्द करण्यात आले आहे. दिल्ली-हाँगकाँगदरम्यानची उड्डाणेही रद्द करण्यात आली आहेत.
फिलिपिन्समध्ये पहिला बळी
चीनच्या बाहेर कोरोनाचा पहिला बळी गेला. फिलिपिन्समध्ये एका व्यक्तीचा या संसर्गाने मृत्यू झाला आहे. ही व्यक्ती चीनच्या वुहान शहरात राहत होती.
जयपूरचे तीन रुग्ण ‘निगेटिव्ह’
जयपूर : जयपूरमध्ये तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त केला जात होता. परंतु वैद्यकीय चाचणीमध्ये त्यांना लागण झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. या तिघांना शनिवारी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते
चीनमधील मृतांची संख्या ३०५
बीजिंग : कोरोना विषाणूंमुळे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ३०५ वर पोहोचली आहे. या विषाणूंचा १४,५६२ लोकांना संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले आहे. चीनमधील एनएचसीच्या माहितीनुसार, सर्व मृत्यू हे हुबेई प्रांतात झाले आहेत. शनिवारी या संसर्गाची ४५६२ नवी प्रकरणे समोर आली आहेत. शनिवारी ३१५ लोकांची प्रकृती गंभीर होती आणि ८५ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.एकूण २११० रुग्णांची प्रकृती गंभीर आहे, तर १९,५४४ लोकांना या विषाणूंचा संसर्ग झाल्याचा संशय आहे. एकूण ३२८ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
चीनमध्ये अडकलेले पाकचे विद्यार्थी संतप्त; इम्रान खान यांना भारताकडून शिकण्याचा सल्ला
इस्लामाबाद : भारत, अमेरिका, बांगलादेश, श्रीलंका व इतर देश कोरोनाग्रस्त चीनमध्ये अडकलेल्या आपापल्या नागरिकांना देशात परत नेण्यासाठी विशेष मोहिमा राबवत असताना पाकने मात्र आपल्या विद्यार्थ्यांना आणण्यास नकार दिला आहे. यावरून पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर टीका होत आहे. पाकिस्तानच्या एका विद्यार्थ्याने सोशल मीडियावर पोस्ट टाकून सांगितले की, आम्ही स्वत:ला खोलीत बंद करून घेत आहोत.
चीनमधून २२३ जणांना आणले!
एअर इंडियाने शनिवारी विशेष विमानाने चीनमधील वुहान प्रांतातून ३२४ व्यक्तींना व रविवारी विशेष विमानाने २२३ व्यक्तींना भारतात परत आणले. नवी दिल्ली विमानतळावर त्यांना आणण्यात आले. या व्यक्तींचे थर्मल स्कॅनिंग वुहान येथे करण्यात आले.