नवी दिल्ली - देशावर आलेले कोरोना विषाणूचे संकट दिवसेंदिवस अधिकाधिक गंभीर होत चालले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी लॉकडाऊनसारखा धाडसी निर्णय घेण्यात आल्याने अनेक व्यवहार ठप्प झाले आहेत. याचा फटका आरटीओ आणि देशातील लक्षावधी वाहनचालकांनाही बसत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनचालकांना दिलासा देणारा मोठा निर्णय घेतला आहे. ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्राईव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्च पर्यंत वैध आहे त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारने निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशी सूचना देण्यात आली आहे. या निर्णयामुळे ज्या वाहनचालकांच्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्राईव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्चरोजी संपत आहे अशा वाहनचालकांना दिलासा मिळणार आहे.
तत्पूर्वी, देशभरात टोलवसुलीला तात्पुरत्या स्वरूपात स्थगिती देण्याचा निर्णय गडकरी यांनी काही दिवसापूर्वी घेेेतला होता. लॉकडाऊनच्या काळात टोलनाक्यांवर कोणत्याही स्वरूपाचा टोल आकारला जाणार नाही. मोदींनी जाहीर केलेल्या १४ एप्रिलपर्यंत भारतात कुठल्याही टोलनाक्यावर टोलवसुली करता येणार नाही, असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केले होते. अत्यावश्य सेवा पुरवणाऱ्या वाहनांना कोणत्याही प्रकारचा विलंब होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला होता.