नवी दिल्ली – राजधानीत कोरोना रुग्णसंख्येत घट होऊन आता १ हजारांच्या खाली आकडेवारी गेली आहे. हॉस्पिटलमधील परिस्थिती पाहता अत्यंत बिकट अवस्था दिसत आहे. लॉकडाऊनमुळे गरिबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आहे. रोजगार नसल्याने पैसे नाहीत, पैसे नसल्यानं खायला अन्न नाही त्यामुळे त्याचा सर्वाधिक फटका हा गरीब कुटुंबांना झाल्याचं दिसून येते.
५५ वर्षीय मोहम्मद नौशाद आणि फातिमा खातून ५ मुलांसह दिल्लीत एका १ बीएचके फ्लॅटमध्ये राहतात. नौशाद एका हॉटेलमध्ये कामाला होता. त्याठिकाणी तो चपाती बनवायचा. मागील वर्षभरापासून सुरु असलेल्या महामारीनं नौशादच्या हातचं काम गेले. त्यानंतर रिक्षा भाड्याने घेऊन तो चालवू लागला. परंतु कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने त्याचं कमवण्याचं हे साधनही बंद झालं. आता मुलांना जेवणं मिळणंही कठीण झालं आहे. हाती एकही दमडी नसल्याची खंत नौशादनं बोलून दाखवली.
नौशाद म्हणाला की, आमच्याकडे पैसे नाहीत. रोज घरमालक येतो आणि भाडं दिलं नाही तर घर खाली करा अशी धमकी देतो. आमची अशी अवस्था आहे की, आता आम्ही किडनीही विकायला तयार आहोत. कारण आमच्या मुलांना जेवण मिळेल. भाडं कसं द्यायचा हा मोठा प्रश्न आहे. ५ मुलं आहेत. पण त्यांचे कमवण्याचं वय नाही. माझंही उत्पन्न नाही असं त्याने सांगितले. तर आमच्याकडे जी बचत होती ती आता संपली. त्यामुळे आम्ही कोणतंही काम करण्यास तयार आहोत. कोरोना महामारीत आम्ही संघर्ष करून जीवन जगतोय पण आता भूकमारीनं मरू असं वाटतंय अशी व्यथा फातिमा खातून यांनी मांडली.
पहिलं लसीकरण कर, मग कामावर ये
६७ वर्षीय सुनीता कुमारी दक्षिण दिल्लीतील घरांमध्ये घरकाम करण्यासाठी जाते. त्यांचा मुलगा दिल्लीत मजुरी करतो. परंतु दोघांनाही नोकरी मिळत नाही. मी घरकाम करते परंतु दुसऱ्या लाटेत माझी नोकरी गेली असं सुनीता कुमारी म्हणाल्या. आता आम्हाला नोकरी मिळाली नाही तर मरू असं त्या म्हणतात. काही जण बोलतात लसीकरण करा आणि कामाला या. आता आम्हाला लस कुठे मिळणार, आमच्याकडे खायचे पैसे नाहीत मग लस कशी घ्यायची असा प्रश्न त्यांना पडला आहे.