नवी दिल्ली - कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी देशात सर्व स्तरावर उपाययोजना करण्यात येत आहेत. कोरोनाच्या नियंत्रणासाठी देशात युद्धपातळीवर यंत्रणा कामाला लागली असून सर्व राज्यांमध्ये संशयितांची माहिती घेण्याबरोबर तपासणी, क्वॉरंटाईन सुरू केले आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांकडूनही शासनाला सहकार्य करण्यात येत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या आकड्यातही वाढ झाली असून रुग्णांची संख्या 9000 वर पोहोचली आहे. तर 308 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक बातम्याही समोर आल्या आहेत. उत्तराखंडमध्ये गेल्या चार दिवसांत कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याची माहिती समोर आली आहे.
उत्तराखंडच्या आरोग्य खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उत्तराखंडमध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या ही 35 आहे. या राज्यात गेल्या चार दिवसांत एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेला नाही. त्यामुळे रविवारी (12 एप्रिल) संध्याकाळपर्यंत ही संख्या कायम राहिली आहे. आठ एप्रिलनंतर राज्यात कोरोनाचा एकही पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. आरोग्य विभागाच्या हेल्थ बुलेटिनमध्ये रविवारी मेडिकल कॉलेज हल्द्वानी आणि एम्स ऋषिकेशमधून एकूण 93 सँपलचे रिपोर्ट मिळाले. ते सर्व रिपोर्ट निगेटिव्ह असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कोरोना साथीमुळे इटलीमध्ये जशी भयानक स्थिती निर्माण झाली ती वेळ केंद्र सरकारने लागू केलेल्या 21 दिवसांच्या लॉकडाऊनमुळे भारतावर ओढविली नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) या संस्थेने म्हटलं आहे. भारतातील कोरोना साथीच्या स्थितीचा या संस्थेने आढावा घेतला आहे. त्यासंदर्भातील अहवालात म्हटलं आहे की, कोरोनाबाबत भारताला इटली होण्यापासून लॉकडाऊनने वाचविले आहे.
देशातील कोरोना रुग्णांची संख्याआठ हजारांहून अधिक झाली आहे. त्यातील सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर रुग्णालयांत उपचार करण्यात येत आहेत. देशातील फक्त 78 जिल्ह्यांपुरता या साथीचा फैलाव मर्यादित राहिला आहे. केंद्रीय परराष्ट्र खात्याचे अतिरिक्त सचिव विकास स्वरूप यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन पुकारला नसता तर कोरोनाचा भारतात प्रचंड प्रमाणात संसर्ग होऊन इटलीत निर्माण झाली तशी परिस्थिती उद्भवली असती. मात्र केंद्र सरकारने वेळीच योग्य निर्णय घेतला, असेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
भारताचा इटली होणे लॉकडाऊनमुळे टळले, ICMR कडून निर्णयाचं कौतुक
देशात गंभीर रुग्णांचे प्रमाण आटोक्यात, ७१६ रुग्ण आतापर्यंत बरे