नवी दिल्ली - केवळ चीनच नाही तर जगभरात कोरोना रुग्णांमध्ये वाढ होताना पाहायला मिळतेय. मागील २४ तासांत जगात ५.३७ लाख रुग्ण आढळले आहेत. त्यात १३९६ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत जपानमध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळलेत. अमेरिकेतही ५० हजाराहून अधिक कोरोना रुग्ण सापडलेत. चीनमध्ये कोरोनामुळे हाहाकार उडाला आहे. या महामारीमुळे लोकांचा जीव जात आहे.
हॉस्पिटलमध्ये रुग्णांच्या उपचारासाठी जागा शिल्लक नाही. WHO नं म्हटलंय की, कोरोनाच्या लाटेमुळे चीनमधील हॉस्पिटलमध्ये गर्दी झालीय. चीनसोबतच अमेरिका, जपानसह जगातील अनेक देशांमध्ये कोरोना रुग्णसंख्या वाढू लागली आहे. यातच भारत सरकार आणि राज्य सरकारेही अलर्ट मोडवर आले आहेत.(Coronavirus in India)
२४ तासात जगभरात किती रुग्ण आढळले?वर्ल्डोमीटर या कोरोनाच्या आकडेवारीवर नजर ठेवणाऱ्या संस्थेनुसार गेल्या २४ तासांत जगभरात ५.३७ लाख रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, महामारीमुळे १३९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. जगभरात आतापर्यंत कोरोनाचे ६५, ९४, ९७, ६९८ रुग्ण आढळले आहेत. २० कोटी सक्रिय रुग्णे आहेत.
सर्वाधिक रुग्ण जपानमध्ये आढळलेगेल्या २४ तासांत जपानमध्ये कोरोनाचे २.०६ लाख रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, २९६ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतही ५० हजारांहून अधिक रुग्ण आढळून आले आहेत. तर ३२३ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. याशिवाय दक्षिण कोरियामध्ये ८८,१७२, फ्रान्समध्ये ५४,६१३ आणि ब्राझीलमध्ये ४४,४१५ रुग्ण आढळले आहेत. तर ब्राझीलमध्ये या महामारीमुळे १९७ लोकांचा मृत्यू झाला आहे.
भारतात किती रुग्ण आढळले?गेल्या २४ तासांत भारतात १४५ रुग्ण आढळले आहेत. मात्र, या काळात कोणालाही जीव गमवावा लागला नाही. देशात आतापर्यंत ४४,६७७,५९४ प्रकरणे आढळून आली आहेत. त्याच वेळी, महामारीमध्ये आतापर्यंत ५.३ लाख लोकांनी आपला जीव गमावला आहे. देशात केवळ ४६७२ सक्रिय रुग्ण आहेत.
चीनमध्ये किती रुग्ण आढळले?चीनच्या अधिकृत आकडेवारीनुसार, बुधवारी देशभरात ३०३० रुग्ण सापडले आहेत. तर कोणाचाही मृत्यू झालेला नाही. याआधी मंगळवारी चीनमध्ये कोरोनामुळे ५ जणांचा मृत्यू झाला होता. मात्र, चीनमधून समोर आलेले व्हिडीओ आणि फोटो वेगळीच कहाणी सांगत आहेत. एवढेच नाही तर चीनमध्ये सध्याच्या लाटेमुळे रुग्णालये तुडुंब भरल्याचे डब्ल्यूएचओने मान्य केले आहे.
भारत सरकार अलर्ट मोडवरजगातील सर्व देशांमध्ये कोरोनाची वाढती प्रकरणे पाहता भारत सरकार अलर्ट मोडवर आले आहे. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी कोरोनाच्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. त्यांनी सांगितले की, भारत सरकारने प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयारी केली आहे. कोरोना अजून संपलेला नाही. मी सर्व संबंधितांना सतर्क राहण्याच्या आणि देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. लोकांनी कोरोनाची लस घ्यावी असं मी आवाहन करतो.
राज्य सरकारेही सतर्कआरोग्य मंत्रालयाने अलीकडेच राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना अलर्ट जारी केला होता. त्यात म्हटले आहे की, सर्व राज्यांनी कोविड-19 संक्रमित प्रकरणांचे नमुने अनुक्रमासाठी INSACOG जीनोम सिक्वेन्सिंग लॅब (IGSL) कडे पाठवावेत, जेणेकरून नवीन व्हेरिएंट, काही असल्यास, शोधता येतील. आरोग्य मंत्रालयाच्या पत्रानंतर सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशही अलर्ट मोडमध्ये आले आहेत.