कोलकाता - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे देशभरात दररो मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत. काही ठिकाणी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात येत असला तरी काही राज्यांमध्ये मात्र कोरोनाच्या रुग्णसंख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पश्चिम बंगालमध्येही कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात वाढू लागले असून, त्या पार्श्वभूमीवर राज्यातील लॉकडाऊनचे निर्बंध ३१ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आले आहेत. दरम्यान, या आठवड्याच्या अखेरीस बकरी ईद असल्याने या आठवड्यात लॉकडाऊन होणार नाही.
दरम्यान, लॉकडाऊनचे नियम पाळण्याचे आवाहन पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नागरिकांना केले आहे. त्या म्हणाल्या की, धार्मिक सण असल्याने या आठवड्यात लॉकडाऊन लागू राहणार नाही. मात्र लोकांनी एकत्र येणे टाळावे. तसेच घरात राहूनच सण उत्सव साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले.
पश्चिम बंगालमध्ये ३१ ऑगस्टपर्यंत लॉकडाऊनची मुदत वाढवण्यात आली असली तरी त्यापैकी काही दिवस कठोर निर्बंध लागू असतील. याबाबत ममता बॅनर्जी यांनी सांगितले की, २ आणि ५ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाऊन लागू राहील. त्यानंतर ८ आणि ९ ऑगस्ट रोजी संपूर्ण लॉकडाऊन होईल. पुढे १६, १७, २२, २३, २९ आणि ३० ऑगस्ट रोजी राज्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू राहील.
यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे एक हजार रुपयांच्या मदतीची मागणी केली होती. या मदतीचा वापर कोरोनाविरोधातील लढाईत केला जाईल, असे त्या म्हणाल्या होत्या. राज्या आपल्या आपत्ती निवारण कोषातून पैसे घेऊ शकते. पण राज्यात पुन्हा कुठली आपत्ती आली तर पैशांची चणचण निर्माण होई, अशी भीती त्यांनी व्यक्त केली.
दरम्यान, पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत कोरोनाचे ६० हजार ८३० रुग्ण सापडले असून, आतापर्यंत एक हजार ४११ जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात ३९ हजार ९१७ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या राज्यात १९ हजार ५०२ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.