नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊनची घोषणा केली. जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाचं संकट ओळखून मोदींना हा निर्णय घेतला. मात्र, पहिल्या रुग्णापासून सुरुवात झालेल्या देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांनी १००० चा टप्पा पार केला आहे. सद्यस्थितीत देशात १०२४ कोरोनाग्रस्त रुग्ण आहेत. तर महाराष्ट्राती कोरोना रुग्णाचा आकडा २०० पेक्षा जास्त झाला आहे. त्यामुळे, कोरोनाचे संकट अद्यापही देशावासियांना त्रस्त करताना दिसून येत आहे. देशात लॉकडाऊन करण्यात आल्यानंतरही नागरिकांकडून लॉकडाऊनचे उल्लंघन होताना दिसत आहे. अत्यावश्यक सेवेचे कारण देत लोक घराबाहेर पडत आहे. मात्र, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने ही आता चिंतेची बाब बनली आहे. विशेष म्हणजे राजधानी दिल्लीत आज एका दिवसात २३ रुग्णांना कोरोना पॉझिटीव्ह असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
राज्यभरात आज दोन कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला असून कोरोनाग्रस्तांचा आकडा २०० पार गेला आहे. तर ३५ रुग्णांना बरे करून घरी सोडण्यात आले आहे. राज्यभरात एकीकडे दिलासादायक आकडेवारी आलेली असताना दुसरीकडे दिवसभरात २२ नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे राज्यातील एकूण रुग्ण संख्या २०३ वर गेली आहे. या नवीन रुग्णांमध्ये सर्वाधिक १० रुग्ण मुंबईचे आहेत तर ५ रुग्ण पुण्याचे, ३ नागपूरचे, २ अहमदनगरचे तर सांगली, बुलढाणा आणि जळगाव येथील प्रत्येकी १ रुग्ण आहे. दरम्यान, कोरोना आजारातून बरे झालेल्या एकूण ३५ रुग्णांना आतापर्यंत घरी सोडण्यात आले आहे. आज राज्यात २ करोना बाधित रुग्णांचे मृत्यू झाले. एका ४० वर्षीय महिलेचा काल के ई एम रुग्णालयात तीव्र श्वसनावरोधामुळे मृत्यू झाला होता. ती करोना बाधित असल्याचे आज स्पष्ट झाले. तिला उच्च रक्तदाबही होता. बुलढाणा येथे एका ४५ वर्षीय पुरुषाचा मृत्यू करोना मुळे झाला तो मधुमेही होता. राज्यातील करोना बाधित मृत्यूची संख्या आता ८ झाली आहे.
देशभरात कोरोनची लागण झाल्यानंतर उपचारादरम्यान एकूण २७ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान मोदींना लॉकडाऊनचा निर्णय लवकरच, घेतल्यामुळे परिस्थिती काहीही आटोक्यात आणण्यात भारताला यश आले आहे. मात्र, अद्यापही १ हजार रुग्णांची संख्या ही चिंतेची बाब आहे. दररोज या रुग्णसंख्येत वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेऊन, उपाय म्हणून घरातच राहणे उचित आहे.