नवी दिल्ली : देशात सलग दुसऱ्या दिवशी कोरोनाच्या रुग्णांची संख्या घटली असून, मृतांचा आकडाही कमी झाला आहे. शनिवारी कोरोनाचे ३ लाख २६ हजार नवे रुग्ण आढळले व ३,८९० जण मरण पावले. देशात कोरोना रुग्णांची एकूण संख्या २ कोटी ४३ लाखांहून अधिक असून, त्यातील २ कोटी ४ लाख लोक बरे झाले आहेत. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ८३.८३ टक्के आहे.
शुक्रवारी कोरोनाचे ३ लाख ४३ हजार नवे रुग्ण आढळले तर ४ हजार जणांचा मृत्यू झाला होता. केंद्रीय आरोग्य खात्याच्या माहितीनुसार, देशात २ कोटी ४३ लाख ७२ हजार ९०७ कोरोना रुग्ण असून, त्यातील २ कोटी ४ लाख ३२ हजार ८९८ जण बरे झाले. शनिवारी ३ लाख २६ हजार ९८ नवे रुग्ण आढळले तर ३ लाख ५३ हजार २९९ बरे झाले. सध्या ३६ लाख ७३ हजार ८०२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यांनी खरीखुरी आकडेवारी सादर करावीसर्व राज्यांनी कोणत्याही दबावाला बळी न पडता व अत्यंत पारदर्शक पद्धतीने त्यांच्याकडील कोरोना रुग्णांची तसेच या संसर्गाने मरण पावलेल्यांची खरीखुरी आकडेवारी सादर करावी असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. कोरोना रुग्णांची जास्त असलेली संख्या काही राज्ये लपवत असल्याची टीका झाली होती. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांनी हे उद्गार काढले. देशातील कोरोना स्थितीचा मोदी यांनी शनिवारी एका उच्चस्तरीय बैठकीत आढावा घेतला.
पंतप्रधान मदतनिधीतून महाराष्ट्र, राजस्थान, पंजाब, हरयाणासहित अनेक राज्यांना देण्यात आलेले व्हेंटिलेटर सदोष होते. त्या गैरप्रकाराची चौकशी करण्याचे आदेश पंतप्रधानांनी दिले. सदोष व्हेंटिलेटर वापरल्याने रुग्णांच्या जीवाशी खेळ होऊ शकतो असा इशारा वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला होता. जगभरात कोरोनाचे १६ कोटी २५ लाख ५५ हजार रुग्ण असून, त्यातील १४ कोटी ४ लाख ५१ हजार रुग्ण बरे झाले, तर ३३ लाख ७१ हजार जणांचा आजवर कोरोनाने मृत्यू झाला आहे.