तिरुवनंतपूरमः देशात कोरोना व्हायरस ही रोगराई वाऱ्यासारखी पसरते आहे. अनेक देशांमध्ये कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढताना दिसते आहे. कोरोनाबाधितांना इतरांना संसर्ग होऊ नये, यासाठी विलगीकरण कक्षा(आयसोलेशन वॉर्ड)त ठेवलं जातं. परंतु या आयसोलेशन वॉर्डात अनेक रुग्ण नर्स आणि वॉर्डबॉयला सहयोग करत नसल्याची प्रकरणंही समोर आली आहेत. पहिल्यांदा रुग्ण वॉर्डातून पसार होत होते. पण आता चक्क नर्सवरही हल्ला झाल्याचं उघड झालं आहे.दक्षिण केरळमधल्या कोल्लममध्ये ही घटना घडली असून, आरोपी रुग्णाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयसोलेशन वॉर्डातील एका रुग्णाला चहा उशिरानं मिळाल्यानं त्यानं चक्क नर्सच्या कानशिलात लगावली आहे. मस्कतवरून परतलेल्या कोरोनाबाधिताला रविवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. चहा उशिरा मिळाल्याच्या कारणास्तव त्यानं हे कृत्य केलं असून, अशा घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढत होताना दिसत आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, नर्सिंग स्टाफ आणि इतर अधिकाऱ्यांवर हल्ले करणाऱ्यांविरोधात एफआयआर दाखल करण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाग्रस्तांना विलगीकरण कक्षात ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विलगीकरण कक्षात ठेवलेल्या व्यक्तींनी परवानगीशिवाय बाहेर जाऊ नये. कोझिकोडमध्ये माजी खासदारानं मुलाची चौकशी करण्यासाठी आलेल्या कर्मचार्यांशी गैरवर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. ज्याला होम क्वारंटाइन करण्यात आले होते. परंतु त्या खासदाराने हा आरोप फेटाळून लावला होता. दुसरीकडे आखाती देशातून परतलेल्या एका 27 वर्षीय व्यक्तीने मलप्पुरममधील एका आशा (सामाजिक कार्यकर्त्यास आरोग्य मंत्रालयाने मान्यता दिलेल्या) कामगाराच्या घरात घुसून तिच्यावर हल्ला केला. त्यानंतर महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या व्यक्तीला अटक करून वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातील विलगीकरण कक्षात पाठवण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
Coronavirus : कोरोनाग्रस्ताचा उद्दामपणा! वेळेत चहा न दिल्यानं लगावली नर्सच्या कानशिलात
By ऑनलाइन लोकमत | Published: March 25, 2020 4:17 PM