बंगळुरू - कोरोनाविरुद्धच्या लढाईत माणूसकीचे दर्शन अनेकदा घडले आहे, तर कित्येक भावूक क्षणही डोळ्यात साठले जात आहेत. कर्नाटकमध्ये व्हायरल झालेल्या एका व्हिडिओने सर्वांनाच भावूक केलं आहे. आपल्या आईच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या चिमुकलीचा रडतानाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. आपल्या आईला दूरुनच पाहून ही चिमुकली रडताना दिसत आहे. या मुलीचा आई परिचारिका म्हणजे नर्स असून कोविड १९ च्या प्रादुर्भावामुळे सध्या आपल्या कामात व्यस्त आहे. त्यातच, गेल्या १५ दिवसांपासून या नर्स आपल्या घरीसुद्धा गेल्या नाहीत.
सोशल मीडियावर हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्यानंतर कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी फोन करुन संबंधित नर्ससोबत संवाद साधला. तसेच, या नर्सच्या कामाचं आणि कामाप्रति दाखवलेल्या तत्परतेचं कौतुक केलं. कर्नाटकच्या बेलागवी इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायंसेजच्या कोविड १९ वार्डमध्ये गेल्या १५ दिवसांपासून ही नर्स काम करत आहेत. विशेष म्हणजे गेल्या १५ दिवसांत आपल्या ३ वर्षीय मुलीलाही त्यांचं भेटणं झालं नाही. सुगंधा असे या कर्तव्यदक्ष नर्सचे नाव आहे.
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओत चिमुकली आपल्या वडिलांसमवेत दुचाकी वाहनावर आईला भेटण्यासाठी आल्याचं दिसत आहे. रुग्णालयात असलेल्या आईला हात दाखवून ती चिमुकली आपल्या डोळ्यांतून अश्रूंच्या धारा काढत आहे. तर आपल्या तीन वर्षीय लहानशा मुलीला पाहून आईही भावुक झाल्याचे दिसत आहे, पण कोरोनाच्या प्रादुर्भाच्या भीतीने आई आपल्या मुलीलाही जवळ जाऊन भेटू शकत नाही. हा व्हिडीओ मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असून कर्नाटक भाजपाच्या ट्विटर अकाऊंटवरुनही हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कर्नाटकचे मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी फोनवरुन संबंधित नर्सशी संवाद साधत कामाचे कौतुक केले. तसेच, पत्र लिहूनही देत असलेल्या योगदानाबद्दल विशेष स्तुती केली. दरम्यान, एका कार्यक्रमावेळी वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुविधेबद्दल येडीयुरप्पा यांना प्रश्न विचारला होता. त्यावर, बोलताना आम्ही या सर्वांची काळजी घेत आहोत, तसेच या सर्वांप्रति सरकारची प्राथमिकता असल्याचेही ते म्हणाले.
दरम्यान, सध्या देशात कोडिव १९ कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने सर्वत्र वैद्यकीय क्षेत्र, पोलीस कर्मचारी आणि सफाई कर्मचारी रात्रंदिवस काम करताना दिसत आहे. आपल्या कामामुळे अनेकदा त्यांना कुटुंबीयांना वेळ देता येत नाही, घरी जाऊनही घरच्यांना जवळ घेता येत नाही. कोरोनाविरुद्धच्या लढाईत हे कोरोना वॉरियर्स मोठं योगदान देत आहेत.