जेव्हा कोरोना व्हायरस चीनमध्ये पसरायला सुरुवात झाली तेव्हा चीनने रातोरात हजारो खाटांचे हॉस्पिटल उभे केले. तेथील डॉक्टर, नर्सनी 24-24 तास ड्युटी केली. महिला डॉक्टरांना तर मासिक पाळी लांबणीवर टाकण्यासाठी बळजबरीने औषधे देण्यात आली होती. यामुळे महिला कर्मचाऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण होते. चीननंतर इटलीमध्ये कोरोनाने सर्वाधिक कहर मांडला आहे. तेथील डॉक्टर आणि नर्सना रुग्णांची काळजी घेण्य़ासाठी 24 तासांपेक्षा जास्त काम करावे लागत आहे.
नागपूरमध्ये विलगीकरण कक्षात असलेल्या एका डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. अख्ख्या जगभरात कोरोनावर मात करण्य़ासाठी वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित लोक युद्धपातळीवर काम करत आहेत. इटलीमध्ये कोरोनामुळे चीननंतर 1400 लोकांचा मृत्यू झाला आहे.
हा फोटो ट्विटरवर Andrea Vogt या महिलेने शेअर केली आहे. यामध्ये एका नर्सचा फोटो पोस्ट करण्यात आला आहे. यामध्ये ही नर्स मास्कने तोंड झाकून कीबोर्डवर डोके ठेवून झोपली आहे. या नर्सचे नाव एलीन पेग्लियारिनी असे आहे. ती लोम्बार्डी क्षेत्रातील एका हॉस्पिटलमध्ये काम करते. तेथील कर्मचाऱ्यांना मोठ्या कालावधीच्या शिफ्ट कराव्या लागत आहेत.
पेग्लियारिनीचा हा फोटो व्हायरल झाला होता. नेटकऱ्यांनी त्यांना मॅसेज करून त्यांच्या कामाला सॅल्यूट केला आहे. या पोस्टमध्ये तिने म्हटले आहे की, खरेतर मी थकत नाही. 24 तास काम करू शकते. पण आता खरेतर मी थकले आहे आणि चिंतेतही आहे, कारण अशा शत्रूसोबत लढत आहे ज्याला मी ओळखतही नाही.
दुसऱ्या छायाचित्रात एलेसिया बोनारी हिने इन्स्टावर तिचा फोटो पोस्ट केला आहे. यामध्ये तिच्या चेहऱ्यावर मोठमोठे लाल डाग दिसत आहेत. हे डाग दिवसभर मास्क परिधान केल्याने उमटलेले आहेत. यामध्ये तिला सहन कराव्या लागणाऱ्या समस्या मांडल्या आहेत. मास्क तिच्या चेहऱ्यावर नीट बसत नाही. डोळेही योग्यरितीने झाकले जात नाहीत. हॉस्पिटलच्या स्टाफला 6-6 तास न पाणी पिता, टॉयलेटला न जाता काम करावे लागते.
तिसरी एक नर्स डेनियल मैकशिनीने म्हटले की मी गेल्या दोन आठवड्यांपासून लहान मुलाला, घरच्यांना पाहिलेले नाही. मला भीती आहे की तेही कोरोनाच्या कचाट्यात सापडले तर काय हाल होतील. मुलाचे फोटो, व्हिडीओ पाहून मनाची समजूत घालते.
गेल्या आठवड्यात इटलीमध्ये 50 डॉक्टरही कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. अनेक कर्मचारी तणावामध्ये आहेत. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जात आहे.