ओडिशा: देशातील कोरोनाचे संक्रमण चिंताजनक पातळीपर्यंत वाढले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी देशात 14 एप्रिलपर्यत लॉकडाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केले होते. मात्र कोरोनाचा प्रादुर्भाव कमी न होता वाढतच असल्याने देशभरात लॉकडाऊन वाढवण्याचा विचार केंद्र सरकार करत असल्याचे बोलले जात आहे. परंतु केंद्र सरकारच्या या निर्णयाआधीच ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यत राज्यात लॉकडाऊन वाढवण्याचा महत्वाचा निर्णय आज घेतला आहे.
कोरोनाचा वाढता धोका टाळण्यासाठी ओडिशा सरकारने ३० एप्रिलपर्यत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेणारं ओडिशा पहिलं राज्य आहे. तसेच राज्यातील सर्व शैक्षणिक संस्था 17 जूनपर्यंत बंद राहतील अशी माहिती मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिली. त्याचप्रमाणे 30 एप्रिलपर्यंत रेल्वे व हवाई सेवा सुरू न करण्याची विनंती देखील नवीन पटनाईक यांनी केंद्र सरकारकडे केली आहे.
ओडिशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ४५ वर पोहचली असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले असून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देखील देण्यात आला आहे.
देशातील कोरोना बाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. देशात कोरोना ग्रस्तांचा आकडा 5000 पार गेला आहे. तर आतापर्यंत 149 लोकांचा मृत्यू झाला आहे. एकूण 410 लोक उपचारानंतर कोरोनामुक्त झाले असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. बुधवारी जारी करण्यात आलेल्या आकड्यांनुसार, देशामध्ये कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेल्यांची संख्या 5194 वर पोहोचली आहे.