नवी दिल्ली - कोरोना विषाणूचा देशात सर्वत्र झालेला संसर्ग आणि त्याचा वाढता फैलाव हा आरोग्य यंत्रणा आणि सरकारची चिंता वाढवत आहे. दरम्यान, बिहारमधूनदिल्लीतीलबिहार भवनमध्ये शाही लिची घेऊन आलेला मुझफ्फरपूरच्या कृषी विभागातील एक अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. ही शाही लिची राष्ट्रपती, पंतप्रधान आणि इतर केंद्रीय मंत्र्यांना भेट म्हणून पाठवण्यात आली होती. त्यामुळे काही काळ चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र या अधिकाऱ्यांची जबाबदारी केवळ दिल्लीत लिची पोहोचली की नाही हे पाहण्याची होती. लिचीचे वितरण त्यांनी केलेले नाही, असे मुझफ्फरपूरच्या जनसंपर्क कार्यालयाने स्पष्ट केले आहे.
यासंदर्भात मुझफ्फरपूरचे जिल्हाधिकारी चंद्रशेखर प्रसाद सिंह यांनी सांगितले की, हे अधिकारी केवळ लिची नेणारा ट्रक दिल्लीत बिहर भवन येथे पोहोचला की नाही याची पडताळणी करण्यासाठी दिल्लीत गेले होते. हे काम काम आटोपल्यावर ते आपल्या दोन नातेवाईकांना भेटले. नंतर त्यापैकी एक नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्या आधारावर अधिकाऱ्यांने स्वतःची स्वतःची चाचणी करवून घेतली. ती पॉझिटिव्ह आली. मात्र लिचीच्या वितरणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. ते काम बिहार भवनमधील अधिकारीच करतात.
दरम्यान, कोरोना पॉझिटिव्ह आलेले अधिकारीच लिचीचे वितरण करण्यासाठी गेले होते, अशा आशयाच्या बातम्या पसरल्या होत्या. मात्र हे वृत्त प्रशासनाकडून फेटाळून लावण्यात आले आहे. आठवडाभरापूर्वी दिल्लीतून परतलेल्या या अधिकाऱ्यांना कोविड केअर सेंटरमध्ये पाठवण्यात आले आहे. मात्र हे अधिकारी विमानाने परत आले होते. त्यामुळे आता बिहार सरकार कॉन्टँक्ट ट्रेसिंग करणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. देशात कोरोनाचा फैलाव वाढत असताना बिहारमध्ये स्थलांतरित मजुरांसोबत कोरोना विषाणूसुद्धा पोहोचला असून, राज्यातील एकूण ७ हजार ३८० कोरोना रुग्णांपैकी ४ हजार ८४४ रुग्ण हे स्थलांतरित मजूर आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या