नवी दिल्ली : संपूर्ण जगात धास्ती निर्माण करणाऱ्या ओमायक्रॉन या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने अखेर भारतात प्रवेश केल्याचे गुरुवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले. ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण कर्नाटकात आढळून आले. त्यापैकी एक जण ज्येष्ठ नागरिक असून अन्य एक जण डॉक्टर असल्याचे समजते. दरम्यान, एका बाधिताच्या संपर्कात आलेल्या पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे निदर्शनास आले आहे.आतापर्यंत ३० देशांमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले असून ३० देशांनी आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांवर निर्बंध घातले आहेत.
कोण आहेत हे रुग्ण, त्यांची स्थिती काय?- एक जण ६६ वर्षीय असून दक्षिण आफ्रिकेतून आल्यानंतर ते पॉझिटिव्ह आढळले. परंतु लक्षणे नव्हती. त्यांना विलगीकरणात राहण्यास सांगितले. परंतु जिनोम सिक्वेंसिंगच्या आधी खासगी प्रयोगशाळेकडून निगेटिव्ह कोरोना अहवाल घेऊन आठवडाभरापूर्वी ते दुबईला गेले. - अन्य बाधित डॉक्टर असून त्याला २१नोव्हेंबर रोजी अंगदुखी व ताप असा त्रास जाणवला. त्यास ओमायक्रॉनची बाधा झाली आहे. त्याच्या संपर्कातील ५ जणांना कोरोना झाला. सगळ्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
३० देशांमध्ये ३७५ रुग्णभारत, अमेरिकेसह ३० देशांमध्ये ओमायक्राॅन विषाणूची बाधा झालेले ३७५ रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण दक्षिण आफ्रिकेतील आहेत. तेथे १८३ जणांना ओमायक्राॅनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तीन आफ्रिकी देशांतून येणाऱ्यांसाठी नवी नियमावलीमुंबई : द. आफ्रिका, बोत्स्वाना व झिम्बाब्वे या देशांना अतिसंवेदनशील म्हणून जाहीर करण्यात आले आहे. या देशांतून राज्यात येणाऱ्या प्रवाशांची विमानतळावरच आरटी-पीसीआर चाचणी केली जाईल. ती पाॅझिटिव्ह आल्यास प्रवाशाची रवानगी कोविड सेंटरमध्ये होईल. आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने ही नवी नियमावली जाहीर केली. दरम्यान, नायजेरियातून पुण्यात आलेेले तिघे पॉझिटिव्ह आढळून आले.
ओमायक्रॉनचे बाधित देशात आढळले म्हणून घाबरून जाण्याची गरज नाही. मात्र, यासंदर्भात सावध राहणे आत्यंतिक गरजेचे आहे. कोरोनानियमांचे काटेकोर पालन करा आणि गर्दी टाळा. - लव अग्रवाल, सहसचिव, केंद्रीय आरोग्य मंत्रालय.