केंद्र सरकारने आणि राज्यांनी कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरिअंटला रोखण्याचे जिकिरीचे प्रयत्न करूनही ओमायक्रॉन भारतात दाखल झाला आहे.
कर्नाटकमध्ये साऊथ आफ्रिकेतून आलेले दोन रुग्ण कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटने बाधित झाले आहेत. यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. 66 वर्षीय आणि 46 वर्षीय अशा दोन पुरुष प्रवाशांना कोरोनाच्या नव्या व्हेरिअंटची लागण झाली आहे.
या दोन्ही रुग्णांमध्ये कोरोनाची गंभीर लक्षणे नाहीत. दोन्ही ओमायक्रॉनच्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे दिसत आहेत. देशात आणि जगभरातील अशा सर्व प्रकरणांमध्ये आतापर्यंत कोणतेही गंभीर लक्षण आढळून आलेले नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की त्याच्या पुराव्यांचा अभ्यास केला जात आहे, असे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी म्हटले आहे.
जिनोम सिक्वेंसिंगद्वारे कर्नाटकातील दोन रुग्णांना कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन व्हेरिअंटची बाधा झाल्याचे समोर आले आहे. देशात 37 लॅब आहेत. ओमायक्रॉनचे रुग्ण सापडले म्हणून लोकांनी घाबरण्याचे कारण नाही, परंतू काळजी घेणे गरजेचे आहे, असेही अग्रवाल म्हणाले.
जे रुग्ण सापडले आहेत त्यांच्या संपर्कात आलेल्यांची ओळख पटविण्यात आली आहेत. त्यांनाही डॉक्टरांच्या देखरेखीत ठेवण्यात आले आहे., असे अग्रवाल यांनी म्हटले. आतापर्यंत 29 देशांमध्ये ओमायक्रॉन सापडला आहे.