नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणू देशात हातपाय पसरु लागला आहे. या नव्या विषाणूच्या १२ संशयास्पद रुग्णांना दिल्लीच्या लोकनायक जयप्रकाश नारायण (एलएनजेपी) रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले.आफ्रिकेतून आलेल्यांपैकी १० जण बंगळुरूमध्ये बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. त्यांचे फोनही बंद असल्याने हे दहा जण दडून बसले असण्याची शक्यता आहे.
कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेले दोन रुग्ण आढळले होते. महाराष्ट्रातही विदेशातून आलेल्या १२ रुग्णांना कोरोनाची बाधा होती. परंतु तपासणीअंती ते ओमायक्रॉन निगेटिव्ह निघाले. दिल्लीच्या एलएनजेपी रुग्णालयात गुरुवारी ओमायक्राॅनच्या आठ संशयास्पद रुग्णांना दाखल करण्यात आले. तर आणखी चार जणांवर शुक्रवारपासून उपचार सुरू झाले. त्यापैकी दोघांना कोरोनाची बाधा झाली आहे. इतर दोघांच्या कोरोना चाचणीचे अहवाल लवकरच हाती येतील.
कर्नाटकातील एक रुग्ण ६६ वर्षे वयाचा असून तो दक्षिण आफ्रिकेचा नागरिक आहे. तो आपल्या मायदेशात परत गेला. दुसरा रुग्ण ४६ वर्षे वयाचा आहे. त्याने गेल्या काही महिन्यांत कुठेही प्रवास केलेला नाही. शुक्रवारी दाखल केलेल्या चार रुग्णांपैकी दोन जण ब्रिटनहून, एक जण फ्रान्स व आणखी एक नेदरलँँडहून आले आहेत. या चौघांचे चाचणी नमुने जिनोम सिक्वेन्सिंगसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले. कर्नाटकमध्ये दोन रुग्णांना ओमायक्रॉनची बाधा झाली असल्याचे केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी गुरुवारी जाहीर केले होते.
नव्या विषाणूवर कोव्हॅक्सिन प्रभावी?नवी दिल्ली : भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस देशात सध्या उपलब्ध असलेल्या इतर लसींपेक्षा ओमायक्रॉनच्या संसर्गावर अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.
डेल्टापेक्षा याच्या संसर्गाचा वेग अधिक ओमायक्रॉनमध्ये कोरोनाच्या कोणत्याही इतर विषाणूपेक्षा अधिक परिवर्तने झाल्याचे आढळले आहे. तसेच त्याच्या संसर्गाचा वेग डेल्टापेक्षाही अधिक आहे. ओमायक्राॅन हा नवा विषाणू सापडल्याची जागतिक आरोग्य संघटनेने २६ नोव्हेंबर रोजी घोषणा केली होती.