नवी दिल्ली : देशात कोरोनाचे ६९,२३९ नवे रुग्ण आढळून आले असून, या आजाराच्या एकूण रुग्णांची संख्या ३० लाखांपेक्षा अधिक झाली आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या २० लाख झाल्यानंतर त्यात १६ दिवसांतच आणखी दहा लाखांची भर पडली.
देशामध्ये कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या ३०,४४,४९० झाली असून, सुमारे २२,८०,५६६ जण या आजारातून पूर्णपणे बरे झाले आहेत. कोरोनामुळे रविवारी ९१० जण मरण पावले असून, त्यामुळे एकूण बळींची संख्या ५६,७०६ झाली आहे. कोरोना रुग्णांची संख्या १ लाख होण्यासाठी ११० दिवस लागले होते. ती संख्या १० लाख होण्यासाठी ५९ दिवस लागले होते. त्यानंतरच्या २१ दिवसांत ही संख्या २० लाख झाली.
कोरोना रुग्णांचा मृत्यूदर १.८६ इतका कमी राखण्यात भारताला यश आले आहे. दररोज होणाऱ्या कोरोना चाचण्यांच्या प्रमाणात केलेली वाढ, त्यामुळे रुग्ण लवकर सापडण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे वेळीच उपचार होऊन मृत्यूदर कमी झाला आहे.सध्या देशामध्ये ७,०७,६६८ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू असून, एकूण रुग्णांच्या तुलनेत हे प्रमाण २३.२४ टक्के आहे.विविध राज्यांत कोरोना बळींची संख्या याप्रमाणे आहे. तामिळनाडूमध्ये ६,४२०, कर्नाटकमध्ये ४,६१४, दिल्लीमध्ये ४,२८४, आंध्र प्रदेशमध्ये ३,१८९, गुजरातला २,८८१, उत्तर प्रदेशमध्ये २८६७, पश्चिम बंगालला २,७३७ व मध्यप्रदेशमध्ये १,२०६ जण मरण पावले आहेत.
३ कोटी ५२ लाख चाचण्याइंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्च या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार, २२ आॅगस्ट रोजी देशभरात कोरोनाच्या ८,०१,१४७ चाचण्या झाल्या. त्यामुळे कोरोना चाचण्यांची एकूण संख्या ३,५२,९२,२२० झाली आहे.