भूवनेश्वर – कोरोनाची दुसरी लाट भयानक असून वेगाने होणाऱ्या संक्रमणामुळे अनेकांच्या मनात दहशतीचं वातावरण आहे. या दुसऱ्या लाटेत लहान मुलं सर्वाधिक संक्रमित होत असल्याचं दिसून येत आहे. कोरोना काळात आपण अनेक घटना पाहिल्या असतील जिथं इच्छाशक्तीच्या जोरावर अनेकांनी कोरोनावर मात केली आहे. मग ते शंभरी पार केलेले आजोबा असो वा नुकतेच जन्मलेले बाळ असो. संघर्षातून अनेकांनी कोरोनाविरुद्ध लढाई जिंकलेली आहे.
ओडिशामध्ये कोरोना व्हायरसनं संक्रमित असलेल्या एक महिन्याच्या चिमुकलीने चमत्कारच केल्याचं म्हटलं जात आहे. भूवनेश्वरच्या एका हॉस्पिटलमध्ये या नवजात मुलीवर कोरोनाचे उपचार सुरू होते. १० दिवसात या चिमुकलीने कोरोनावर मात दिली आहे. लहान मुलगी मागील १० दिवसांपासून व्हेटिंलेटर होती. माहितीनुसार, ही चिमुकली कोरोनाला हरवणारी देशातील सर्वात लहान कोरोना वॉरियर बनली आहे.
ही नवजात चिमुकली दोन आठवड्यापूर्वी कोरोना संक्रमित झाली होती. त्यानंतर मुलीला कालाहांडीहून भूवनेश्वर येथे हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आणलं. याठिकाणी खासगी दवाखान्यात या नवजात चिमुकलीला ICU व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. १० दिवस ही व्हेंटिलेटरवरच होती. डॉ. अरिजीत महापात्रा म्हणाले की, या मुलीवर रेमडेसिवीर, स्टेरयेड आणि विविध प्रकारचे उपचार करण्यात आले. २ आठवडे तिच्यावर उपचार करण्यात आले. आता मुलगी पूर्णपणे बरी आहे. लवकरच तिला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज केले जाईल. हे चमत्कारापेक्षा कमी नाही असं डॉक्टर म्हणाले.
ओडिशा येथे कोरोनाचे १२,३९० संक्रमित
ओडिशा राज्यात एका दिवसात तब्बल १२ हजार ३९० कोरोना संक्रमित आढळले. राज्यात आतापर्यंत संक्रमणाची संख्या ५ लाख ८८ हजार ६८७ इतकी झाली आहे. तर शुक्रवारी २२ जणांच्या मृत्यूनंतर आतापर्यत या महामारीने एकूण २ हजार २७३ जणांचा मृत्यूंची नोंद झाली आहे. ओडिशामध्ये सक्रीय रुग्णांची संख्या १ लाख ४ हजार १६ इतकी आहे. आतापर्यंत ४ लाख ८२ हजार ३४५ रुग्ण कोरोनामुक्त झालेत. ओडिशामध्ये एका दिवसात ५६ हजार २१४ नमुने तपासले आहेत. जे एका दिवसात सर्वाधिक आहेत.