लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : वर्षभरापूर्वी ‘ऑनलाइन’ ओळख झालेल्या व गेले सहा महिने लग्नाची जय्यत तयारी करून बसलेल्या एका प्रेमी युगुलाने ‘लॉकडाउन’च्या अडचणीवर मातकरत ठरल्या वेळी विवाहही ‘ऑनलाइन’ करून नव्या आयुष्याला मुलखावेगळी सुरुवात केली.
अशा अनोख्या विवाहबंधनात अडकलेल्या मुंबईतील २९ वर्षांच्या नवरदेवाचे नाव प्रीत सिंग असून तो मर्चंट नेव्हीमध्ये अधिकारी आहे. नीत कौर ही त्याची २६ वर्षांची नववधू दिल्लीची आहे. लग्नासाठी निगुतीने शिवून घेतलेल्या उत्तम पोषाखांत सजलेल्या या दाम्पत्याने एका व्हिडिओ कॉलिंग अॅपच्या माध्यमातून ठरल्या मुहूर्ताला पती-पत्नीच्या सहजीवनाच्या आणाभाका घेतल्या. सुमारे दोन तास चाललेल्या त्यांच्या या अनोख्या विवाहाला दोन्ही घरच्या कुटुंबियांखेरीज दुबई, कॅनडा व आॅस्ट्रेलियातील नातेवाईक व मित्रांसह सुमारे ५० वºहाडींनी ‘व्हर्च्युअल’ हजेरी लावून आशीर्वाद दिले. प्रत्येकाने स्वत:च आणलेल्या मिठाईने तोंड गोड केले. एरवी पंजाबी विवाहात होते तशी चक्क भांगडा पार्टीही झाली!
गेल्या शनिवारची त्यांच्या विवाहाची तारीख सहा महिन्यांपूर्वीच ठरली होती व दोन्ही घरांनी लग्न धुमधडाक्यात करण्याची जय्यत तयारीही केली होती. लग्नानंतर हनिमूनला श्रीलंकेला जायचे प्रीत-नीतने बूकिंगही केले होते. पण कोरोनाची महामारी व त्यातून झालेल्या ‘लॉकडाउन’ने मोठी पंचाईत झाली. प्रीतसिंगने मित्रांसाठी गोव्यात ठरविलेली ‘बॅचलर्स’ पार्टी यामुळे रद्द करावी लागलीच होती. तरीही, आनंद व सुख मानण्यावर असते यावर ठाम विश्वास असलेल्या या समंजस युुगुलाने या अडचणीतही आनंदात मिठाचा खडा पडू न देण्याचे ठरविले.प्रीत सिंग सांगतो की, दोन्ही घरच्या वडिलधाऱ्या मंडळींनीही या ‘आॅनलाइन’ विवाहाच्या कल्पनेस फारसा विरोध केला नाही. एरवीही ‘लॉकडाउन’ संपल्यावर विवाह करायचे म्हटले असते तरी तेव्हा मोठा समारंभ करता येईलच, याची खात्री नव्हती. त्यामुळे घरांतील आनंदी वातावरण एवढ्यासाठी बिघडू कशाला द्यायचे, असा आम्ही सर्वांनीच विचार केला. ‘लॉकडाउन’ संपल्यावर नीतकौर सर्व रीतीरिवाज पाळून सासरी येईल, असेही प्रीतसिंग याने सांगितले.