कोची – देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना कोरोनाच्या लढाईत केरळमधून आनंदाची बातमी समोर येत आहे. बुधवारी या दक्षिणेकडील केरळ राज्यात फक्त एक कोरोनाचा रुग्ण आढळला. ही माहिती देताना मुख्यमंत्री पिनाराई विजयन म्हणाले की, आता राज्यात कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांची संख्या ३८७ झाली आहे, त्यापैकी केवळ १६७ लोकांवर उपचार सुरु आहेत. बाकीच्या रुग्णांची तब्येत ठीक आहे.
केरळ हे असे राज्य आहे ज्याठिकाणी देशात कोरोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळून आला होता. ३० जानेवारी रोजी देशातील पहिला कोविड -19 रुग्ण केरळच्या त्रिसूरमध्ये आढळला. त्यानंतर राज्यात रुग्णांची संख्या सातत्याने वाढत राहिली. बर्याच काळ केरळ कोरोना रुग्णांच्या यादीत देशात अव्वल स्थानावर होता परंतु आज या यादीमध्ये तो दहाव्या स्थानावर घसरला आहे. ही यादी अशी आहे ज्यामध्ये कोणत्याही राज्याला प्रथम येण्याची इच्छा नाही. परंतु दुर्दैवाने संक्रमणाच्या २ हजार ९१६ रुग्णांमुळे महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आहे.
बिकट परिस्थितीतून वेगात सावरलेला केरळ बनला आदर्श
कोरोनाविरूद्धच्या युद्धात केरळने इतके मोठे यश कसे मिळवले? हा नैसर्गिक प्रश्न आहे. खरं तर, देवभूमी म्हणून ओळखल्या जाणार्या केरळमध्ये राज्य सरकार आणि स्थानिक प्रशासनाची नेमकी रणनीती अन् त्यानुसार ठोस कारवाई करून केवळ ढासळणारी परिस्थितीच वेगाने सांभाळली नाही तर इतर राज्यांसाठीही एक उदाहरण म्हणून समोर आलं आहे.
कासारगोड, कोरोना व्हायरसमुळे सर्वाधिक प्रभावित केरळ राज्यातील जिल्हा आहे. केरळमधील कोरोना हॉटस्पॉट म्हणून कासारगोड उदयास आला जिथे आतापर्यंत १३५ हून अधिक लोकांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. तेथील परिस्थिती वेगाने खालावत होती, जेव्हा मुख्यमंत्री विजयन यांनी आयपीएस अधिकारी विजय सखारे यांना कासारगोडचे विशेष अधिकारी म्हणून नियुक्त केले. साखरे यांनी जिल्ह्यातील विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सर्वतोपरी रणनीती बनविली आणि त्यावर काम केले.