नवी दिल्ली : देशातील १० लाख संख्येतील निमलष्करी दलांना ५ एप्रिलपर्यंत रजेतील प्रवास किंवा तुकड्यांच्या हालचाली किंवा नियमित सरावासाठीचा प्रवास तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले गेले आहेत. कोरोना विषाणूचा प्रसार या दलांमध्ये होऊ नये म्हणून ‘तुम्ही जेथे आहात तेथेच राहा’ यासाठी हा आदेश असल्याचे अधिकाऱ्याने रविवारी सांगितले.या दलांतील अधिकारी व जवानांना हे सांगण्यात आले आहे की, तुमच्या कुटुंबातील कोणीही गेल्या काही दिवसांत परदेश प्रवास केलेला नाही किंवा केला असल्यास त्यांची तपासणी करून घ्यावी लागेल किंवा परिस्थिती पाहून त्यांना वेगळे ठेवावे लागेल, अशी माहिती लेखी नमुन्यात द्यायची आहे.हे आदेश मुख्यालयातून सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स, सीमा सुरक्षा दल, इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस, सशस्त्र सीमा बल आणि नॅशनल सिक्युरिटी गॉर्ड यांना फारच मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूचा उपद्रव होऊ नये यासाठी दिले गेले आहेत.या दलांकडे दहशतवादविरोधी कारवायांसह सीमांवर पहाºयाची व देशांतर्गत सुरक्षेची जबाबदारी आहे. ही दले सीमेवरील छावणी भागांजवळ राहतात आणि कोरोनाची बाधा झालेला एकही रुग्ण अगदी कमी वेळेत शेकडो जणांना बाधित करू शकतो. त्यामुळे दलांतील कोणीही नित्याच्या कर्तव्यासाठी, रजेतील किंवा रजा संपल्यामुळे कर्तव्यावर परतण्यासाठी ५ एप्रिलपर्यंत प्रवास करू नये, असे सांगण्यात आले. या आदेशाचा ५ एप्रिलनंतर आढावा घेतला जाईल.
Coronavirus : जेथे आहात तेथेच राहण्याचे देशातील १० लाख जवानांना आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2020 4:02 AM