नवी दिल्ली – जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी भारतासह अनेक देशांनी लॉकडाऊन करण्याची घोषणा केली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत तब्बल 24,090 लोकांचा मृत्यू झाला असून 532,263 लोकांना संसर्ग झाला आहे. तर 124,349 लोक बरे झाले आहेत. भारतातगुरुवारी (26 मार्च) एका दिवसात तब्बल सात जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. तर आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाला आहे.भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही 700 हून अधिक झाली आहे. कोरोनाग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेकांनी पुढाकार घेतला आहे. कोरोनासारख्या जागतिक महामारीचा मुकाबला करण्यासाठी अनेक राजकीय नेते पुढे सरसावले आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दल म्हणजेच सीआरपीएफने कोरोनाग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.
देशाच्या सुरक्षिततेची जबाबदारी ही केंद्रीय राखीव पोलीस दलाकडे असते. सीआरपीएफनेही आपले एकदिवसाचे वेतन कोरोनाग्रस्तांना मदत म्हणून दिले आहे. ‘कोरोना व्हायरसच्या या संकटाच्या काळात आम्ही देशासोबत ठामपणे उभे आहोत’ असं सीआरपीएफने म्हटलं आहे. सीआरपीएफच्या जवानांनी आणि अधिकाऱ्यांनी 33 कोटी 81 लाख रुपयांचा धनादेश पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीमध्ये जमा केला आहे. यासोबतच गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रविशंकर प्रसाद आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे.
शिवसेना खासदार, आमदारांचे एक महिन्याचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीत देण्याचा निर्णय घेतल्याची माहिती शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटद्वारे दिली आहे. तसेच एक सामाजिक जबाबदारी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्य व केंद्राच्या सदर सहाय्यता कार्यास हातभार लागावा या हेतूने राज्य विधिमंडळातील विधानसभेचे व विधान परिषदेचे सदस्य यांचे एक महिन्याचे वेतन 'मुख्यमंत्री सहायता निधी'साठी तसेच संसदेतील लोकसभा व राज्यसभा सदस्यांचे एक महिन्याचे वेतन 'प्रधानमंत्री सहायता निधी'साठी देण्याचा निर्णय शरद पवारांनी घेतला आहे. तशाप्रकारे आदेश पवारांनी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना आणि खासदारांना दिले आहेत.
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी त्यांच्या मतदारसंघात खासदार निधीतून 2 कोटी 66 लाखांचा निधी घोषित केला आहे. वायनाडमध्ये आवश्यक आरोग्यविषयक उपकरणांची खरेदी करण्यासाठी या निधीचा वापर व्हावा असं त्यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकाऱ्यांना सांगितले आहे. नितीन गडकरी यांनी एक महिन्याचं वेतन पंतप्रधान सहाय्यता निधीत देणार आहेत. गडकरी यांनी देशातील लोकांना संकटाच्या काळात पुढे येऊन योगदान द्यावं असं आवाहनही केलं आहे. कोरोना व्हायरसच्या सामना करण्यासाठी देश सज्ज झालेला असतानाच देशातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : चिंताजनक! देशात एका दिवसात 7 जणांना गमवावा लागला जीव, कोरोनाग्रस्तांचा आकडा 700 वर
Coronavirus : भारताचे 'मिशन कोरोना'; 'या' राज्यात उभारणार देशातील सर्वात मोठं रुग्णालय
Coronavirus: कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी राजकीय नेते सरसावले; पाहा कोणत्या नेत्याने किती मदत केली?
CoronaVirus : ...फक्त लॉकडाऊन करून चालणार नाही; रघुराम राजन यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
Coronavirus: राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आज फेसबुकद्वारे राज्यातील जनतेशी संवाद साधणार