नवी दिल्ली - कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. जगभरात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरु आहे. असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे.
आतापर्यंत भारतासह संपूर्ण जगात कोरोना बाधित रुग्णांची संख्या १६ लाख ५० हजारहून अधिक आहे. तर एक लाखाहून जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये ३ लाख ६८ हजार ६६८ लोक या आजारापासून बरे झाले आहेत. संपूर्ण जगाच्या तुलनेत इटलीमध्ये सर्वाधिक कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीमध्ये आतापर्यंत १८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतही कोरोना बाधित रुग्णांची संख्या ४ लाखांहून अधिक आहे. अमेरिकेत गेल्या २४ तासांत दोन हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. जान्स हॉपकिंस युनिव्हर्सिने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेत गेल्या २४ तासांत २, १०८ लोकांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेतील कोरोना बाधितांची आकडेवारी जगात सर्वाधिक आहे. मात्र, मृतांची संख्या इटलीमध्ये जास्त आहे. जगात कोरोना मृतांचा आकडा पाहिला तर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर स्पेन तिसऱ्या क्रमांकावर आहे. स्पेनमध्ये १५ हजार ९७० हून अधिक लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
ब्रिटनमध्ये कोरोनामुळे गेल्या २४ तासांत ९८० लोकांचा मृत्यू झाला आहे. ब्रिटनमध्ये एका दिवसात कोरोनामुळे मृतांचा हा आकडा सर्वाधिक आहे. याठिकाणी आतापर्यंत ८ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर ७१ हजारहून अधिक लोकांना कोरोनाची बाधा झाली आहे. भारतात सुद्धा ७ हजार ५९८ कोरोना बाधित रुग्ण आहेत. तर २४६ लोकांचा मृत्यू झाले आहे. याशिवाय, ७६४ लोक या आजारापासून बरे झाले आहेत.