Coronavirus Third Wave, Omicron: भारतात कोविडच्या ओमिक्रॉन व्हेरियंचच्या माध्यमातून सुरू झालेल्या तिसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका तरुण पिढीला बसला. ३७ रुग्णालयांच्या आकडेवारीच्या सर्वेक्षणात असे दिसून आले की कोविडच्या तिसऱ्या लाटेत सरासरी ४४ वर्षे वयोगटातील तरुण लोकसंख्या जास्त संक्रमित झाली. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (ICMR) महासंचालक बलराम भार्गव यांनी पत्रकार परिषदेत यासंबंधी माहिती दिलं.
"कोविडच्या या लाटेत रुग्णांमध्ये घसा खवखवण्याची समस्या अधिक दिसून आली. मागील लाटेच्या तुलनेत, सरासरी ४४ वर्षे वय असलेल्या मध्यमवयीन लोकसंख्येला या लाटेत जास्त संसर्ग झाला. पूर्वीच्या लाटेंमध्ये संक्रमित लोकसंख्येचे सरासरी वय ५५ वर्षे होते. या वेळचा सर्व्हे हा कोविडच्या नॅशनल क्लिनिकल रजिस्ट्रीच्या आधारावर करण्यात आला आहे. सर्व्हेसाठी ३७ वैद्यकीय केंद्रांमध्ये दाखल झालेल्या रुग्णांबद्दल माहिती गोळा करण्यात आला आहे. आम्ही दोन वेळा अभ्यास केला. १५ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर असा एक काळ होता, तेव्हा डेल्टाचे वर्चस्व असल्याचे मानलं गेलं. तर दुसरा कालावधी १६ डिसेंबर ते १७ जानेवारी असा होता ज्यावेळी ओमिक्रॉनची अधिक प्रकरणे समोर येत होती", अशी माहिती भार्गव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
तिसऱ्या लाटेत औषधांचा वापर कमी झाला!
"हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या सुमारे १ हजार ५२० रूग्णांचा आभ्यास करण्यात आला. या तिसऱ्या लाटेत त्यांचे सरासरी वय सुमारे ४४ वर्षे होते. या लाटेत औषधांचा वापर खूप कमी झाल्याचे आढळून आले. पण सुदैवाने मूत्रपिंड निकामी होणे, तीव्र श्वसन रोग आणि इतर रोगांच्या संबंधातील गुंतागुंत कमी झाल्याचेही दिसून आले. या डाटामधील लसीकरण झालेल्या मृत्यू झालेल्या मध्यमवयीन लोकांपैकी ९० टक्के लोक आधीच अनेक आजारांनी ग्रस्त होते. तसेच लसीकरण न केलेल्या प्रकरणांमध्ये ८३ टक्के लोक आधीच विविध आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे लसीकरण न होणे आणि आधीच अनेक आजारांनी ग्रासणे हे महत्त्वाचे घटक दिसून आले", असं भार्गव यांनी नमूद केलं.