नवी दिल्ली - दक्षिण आफ्रिकेतून फैलावास सुरुवात होऊन युरोपमध्ये थैमान घालत असलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटने आता भारत-चीनसह पाकिस्तानसह अनेक आशियाई देशांमध्ये शिरकाव केला आहे. भारतामध्ये आठ पेक्षा अधिक राज्यांमध्ये आतापर्यंत ओमायक्रॉनचे ४५ रुग्ण सापडले आहेत. तसेच परदेशातून आलेल्या अनेक संशयितांचे नमुने जीनोम सिक्वेंसिंगसाठी पाठवण्यात आले आहेत. दिल्लीमध्येही मंगळावारी ओमायक्रॉनचे चार रुग्ण मिळाले. तर महाराष्ट्रामध्येही आतापर्यंत या व्हेरिएंटचे २० रुग्ण सापडले आहेत. यादरम्यान, ओमायक्रॉन व्हेरिएंटवर कोविड व्हॅक्सिनच्या पडणाऱ्या प्रभावाबाबत कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या नव्या संशोधनामधून चिंता अजून वाढण्याची शक्यता आहे.
कोरोनावर हल्लीच झालेल्या संशोधनामधून कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटपासून संरक्षण करण्यापासून लस कमकुवत ठरत असल्याचे समोर आले आहे. मात्र गंभीर आजारांविरोधात त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. कॅलिफोर्निया विद्यापीठ, सांताक्रूझ च्या बिली गार्डन आणि मार्म किलपेट्रिकने कोरोनावर डेटा समाविष्ट करताना कॉम्प्युटर मॉडेल विकसित केले आहे. त्यानुसार लसीमुळे कोरोना विषाणूच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून अन्य व्हेरिएंटच्या तुलनेत कमी संरक्षण प्रदान होते. मात्र कोरोनावरील लस गंभीर आजारापासून संरक्षण प्रदान करण्यात अधिक सक्षम आहे.
या रिपोर्टनुसार फायझर/बायोएनटेक आणि मॉजर्डा लसीच्या दोन डोसमुळे ओमायक्रॉनविरोधात लक्षण असलेल्या केसमध्ये केवळ ३० टक्के प्रभाव दिसत आहे. मात्र डेल्टा व्हेरिएंटविरोधात हा प्रभाव ८७ टक्के होता. तर बुस्टर डोसनंतर ओमायक्रॉनवरील हा प्रभाव ४८ टक्क्यांपर्यंत प्रभावी ठरू शकते. मात्र गंभीर आजारापासून लस संरक्षण देत आहे. या रिपोर्टनुसार लस ओमायक्रॉनपासून होणाऱ्या गंभीर आजारापासून ८६ टक्क्यांपर्यंत संरक्षण देऊ शकते. तर बुस्टर डोसनंतर हे प्रमाण ९१ टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते.