नवी दिल्ली - जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 212,69 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 3,087,105 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर दुसरीकडे भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा ही वेगाने वाढत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या 29,974 हून अधिक झाली असून आतापर्यंत 937 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान एक दिलासादायक माहिती समोर आली आहे.
देशात आणि जगात कोरोना रुग्णांची संख्या आणि मृतांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असताना कोरोनासंदर्भात दिलासादायक माहिती मिळत आहे. देशात 7027 तर जगात 935,115 जणांनी कोरोनावर मात करून कोरोनाविरुद्धची लढाई जिंकली आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्वच देशांमध्ये खबरदारीचे उपाय केले जात आहेत. कोरोनाग्रस्तांवर रुग्णालयात योग्य उपचार केले जात असून अनेकांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. भारतात आतापर्यंत 7027 हून अधिक जणांनी कोरोनाला हरवलं असून त्यांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर जगात लोक 9,35,115 बरे झाल्याची माहिती मिळत आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या 7 दिवसांपासून देशातील तब्बल 80 जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही नवा रुग्ण आढळलेला नाही. तर 47 जिल्हे असे आहेत की जिथे मागच्या 14 दिवसांपासून कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढलेला नाही. तर दुसरीकडे 21 दिवसांपासून देशाच्या 39 जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित नवा रुग्ण आढळलेला नाही. विशेष म्हणजे भारतातील 17 जिल्हे असे आहेत जिथे मागील 28 दिवसांपासून म्हणजेच जवळपास महिनाभरापासून कोरोनाचा नवा रुग्ण सापडलेला नाही.
आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत कोरोनाचे तब्बल 1594 नवे रुग्ण आढळून आले आहेत तर 5 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या 29,974 झाली आहे. त्यातील 7027 लोक बरे झाले असून 937 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाविरोधातील लढाईत भारत जगातील अनेक देशांसाठी देवदूत ठरला आहे. कोरोनावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळवण्यात इतर देशांच्या तुलनेत भारत यशस्वी झाला आहे. जगभरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांचा आकडा दोन लाखांच्या वर पोहोचला आहे. कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सर्वाधिक संख्या ही अमेरिकेतील रुग्णांची आहे. कोरोना व्हायरसमुळे इटली, स्पेन, अमेरिका आणि युरोपमध्ये गंभीर परिस्थिती ओढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाच्या संकटात जगातील सर्वात मोठं कुटुंब कसं राहतंय एकत्र, जाणून घ्या
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये एकट्या राहणाऱ्या आजोबांना पोलिसांनी दिलं भन्नाट सरप्राईज, Video व्हायरल
'इतना सन्नाटा क्यूँ है भाई?'; यूपीतील साधूंच्या हत्येनंतर काँग्रेसचे भाजपाला १० खोचक प्रश्न
Coronavirus : कनिका कपूर कोरोनाग्रस्तांना देऊ शकत नाही रक्त, 'हे' आहे कारण
Coronavirus : धक्कादायक! कोरोनाग्रस्तांवर उपचार करणाऱ्या प्रसिद्ध डॉक्टरची आत्महत्या
Coronavirus : आनंदाची बातमी! देशातील तब्बल 80 जिल्ह्यांत 7 दिवसांपासून कोरोनाचा एकही नवा रुग्ण नाही
Coronavirus : कोरोनाविरोधातील लढाईत आशेचा किरण, देशात 'ही' औषधं देत आहेत व्हायरसला टक्कर