नवी दिल्ली – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगावर संकट उभं राहिलं आहे. बहुतांश देशांनी कोरोना रोखण्यासाठी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता या काळात इतर सर्व व्यवसाय ठप्प आहेत. त्यामुळे कोरोनानंतर अनेक देशांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार आहे. भारतातही ३ मेपर्यंत लॉकडाऊन सुरु आहे.
देशात आतापर्यंत २० हजाराहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर ६०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. मागील २२ मार्चपासून देशात लॉकडाऊन आहे. यामुळे अनेक कंपन्या, कारखाने बंद आहेत. कामकाज बंद असल्याने मालकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागत आहे. अशातच काही कंपन्यांनी कर्मचाऱ्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे.
कोरोना संकटामुळे बर्याच उद्योगांवर वाईट परिणाम झाला आहे. या महामारीच्या जाळ्यात अडकल्याने हॉटेल व्यवसाय ढासळला आहे. या व्यवसायाशी संबंधित कंपन्या आपल्या कर्मचार्यांची कपात करण्यास सुरुवात केली आहे. देशातील सर्वात मोठी हॉटेल कंपनी ओयो रूम्सने बुधवारी अमेरिकेत काम करणाऱ्या भारतीय कर्मचार्यांना ४ महिन्यांसाठी पगाराशिवाय रजेवर पाठविण्याचा निर्णय घेतला. यासह कंपनीने कर्मचार्यांच्या पगारामध्ये २५ टक्क्यांनी कपात करण्याचे म्हटलं आहे.
बुधवारी ओयोचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी टाऊन हॉलमध्ये कर्मचार्यांशी बैठक घेतली. या दरम्यान रोहित यांनी कंपनीच्या आर्थिक नुकसानीमुळे कर्मचार्यांची कपात करण्याबाबत सांगितले. अल्पावधीसाठी कंपनी काही कर्मचार्यांना विना पगार रजेवर पाठवणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा केली यामुळे कंपनीने भारतीय कर्मचार्यांना ४ मे पासून रजेवर पाठविण्याची घोषणा केली आहे.
रोहित कपूर म्हणाले की, आमच्यासाठी हा एक कठीण प्रवास आहे. परिस्थिती बिघडताना पाहून कंपनीला हा निर्णय घ्यावा लागला. कर्मचार्यांना २५ टक्के वेतन कपातीचा निर्णय मान्य करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या या निर्णयाचा परिणाम एप्रिल ते जुलै २०२० पर्यंतच्या पगारावर होईल असं ते म्हणाले, तर कंपनीचे संस्थापक रितेश अग्रवाल म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून कंपनीची परिस्थिती बिकट आहे. कंपनीचा महसूल आणि व्यवसायात ५० ते ६० टक्क्यांनी घट झाली आहे. यामुळे कंपनीच्या आर्थिक व्यवहारावर याचे परिणाम पाहायला मिळत आहेत असं त्यांनी सांगितले.