नवी दिल्ली : कोरोना विषाणूच्या साथीचा फटका बसलेल्या क्षेत्रांना शक्य तितक्या लवकर आर्थिक पॅकेज घोषित करण्यात येईल, असे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले. पॅकेजसाठी कोणतीही कालमर्यादा मात्र त्यांनी सांगितली नाही.कोविड-१९ विषाणूच्या आर्थिक परिणामांचा आढावा घेण्यासाठी नागरी उड्डयन, पशुपालन, पर्यटन आणि एमएसएमई या मंत्रालयांच्या अधिकाऱ्यांची एक बैठक सीतारामन यांनी घेतली. त्यानंतर सीतारामन यांनी पत्रकारांना सांगितले की, या मंत्रालयांनी त्यांच्या क्षेत्राचा आढावा बैठकीत सादर केला. हितधारकांशी सल्लामसलत करून त्यांनी हा आढावा घेतलेला आहे. वित्त सचिव आणि अर्थव्यवहार सचिव यांच्या उपस्थितीत आम्ही त्यावर विस्तृत चर्चा केली. त्यांनी केलेल्या सूचना आम्ही एकत्रित करीत आहोत.यावर आम्ही एक अंतर्गत बैठक घेऊन संकटाचा मुकाबला करण्यासाठी ठोस कृती कार्यक्रम तयार करू. पंतप्रधानांनी जाहीर केलेल्या कृती दलाची स्थापना अद्याप झालेली नाही, असे त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.गुरुवारी देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ‘कोविद-१९ आर्थिक प्रतिसाद कृती दल’ स्थापन करण्याची घोषणा केली होती. सीतारामन यांनी सांगितले की, कृती दलाची स्थापना अद्याप झालेली नाही. तथापि, तातडी लक्षात घेऊन आपल्या मंत्रालयाने ही बैठक घेतली आहे.
Coronavirus :कोरोनाचा फटका बसलेल्या क्षेत्रांसाठी लवकरच पॅकेज, वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2020 5:30 AM