चंदिगड - भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 1900 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 58 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. जगभरात भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनाने असंख्य बळी घेतले आहे. याच दरम्यान पंजाबमधून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेल्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आणि सुवर्ण मंदिराचे माजी 'हजूरी रागी' निर्मल सिंह यांचा गुरुवारी (2 एप्रिल) कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. 2009 मध्ये निर्मल सिंह यांना पद्मश्री पुरस्काराने सम्मानित करण्यात आले होते.परदेशातून परतल्यानंतर त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कोरोनासदृश्य लक्षणं दिसून आल्याने त्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर निर्मल सिंह यांना कोरोना झाल्याचं निष्पन्न झालं.
गुरु नानक देव रुग्णालयाचे सर्जन प्रभदीप कौर जौहल यांनी दिलेल्या माहितीनुसार, 62 वर्षीय निर्मल सिंह यांना त्रास होत असल्यानं रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू असतान त्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं होतं. अस्थमामुळे त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली आणि गुरुवारी कोरोनामुळे त्यांचा मृत्यू झाला आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील 24 तासांत 400 ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. देशात 1900 रुग्ण आणि 58 बळी आहेत. मागील 24 तासांत 132 जण बरे झाले किंवा रुग्णालयातून सुटी मिळाली आहे.
देशात कोरोनाची संख्या वाढत असताना हरियाणाच्या गुरुग्राममध्ये दिलासादायक चित्र आहे. कोरोनाची लागण झालेल्या 10 रुग्णांपैकी 9 जण बरे झाले आहेत. या पैकी काहींना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. घरी सोडण्यात आलेल्या व्यक्तींना डॉक्टरांनी काही दिवस विलग राहण्याचा सल्ला दिल्याची माहिती मिळत आहे. तसेच बुधवारी ( 1 एप्रिल) हरियाणामध्ये एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला नाही. सुरुवातीला गुरुग्राममध्ये 10 करोना पॉझिटिव्ह आढळले होते. यापैकी आता 9 जणांची प्रकृती ठिक असून ते बरे झाले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : गुरुग्राममधून आनंदाची बातमी, 10 पैकी 9 जण कोरोनामुक्त
coronavirus : पंतप्रधान मोदी आज सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी साधणार संवाद
Coronavirus: कोरोना विषाणूचे भारतात २४ तासांत ४०० नवे रुग्ण; १३२ जण झाले बरे; एकूण ५८ जणांचा मृत्यू