नवी दिल्ली : एकीकडे कोरोनामुळे भारत-पाकिस्तान हे दोन्ही देश त्रस्त असताना पाकिस्तान सीमेपलिकडून भारतावर गोळीबार करण्यामध्ये व्यस्त आहे. तर दुसरीकडे दुसऱ्या देशांत अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना परत आणण्यासाठी कोणतेच प्रयत्न करत नाहीय. यामुळे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधात लोकांमध्ये कमालीचा राग आहे. अशातच भारतामध्ये अडकलेल्या पाकिस्तानी नागरिकांना मायदेशी पाठविण्याची तयारी भारताने सुरु करून माणुसकीचा नवा आदर्श जगसमोर ठेवला आहे.
पाकिस्तानातील हिंदू नागरिकांना रेशनही दिले जात नाहीय. तर पाकव्याप्त काश्मीरमध्ये कोरोनाचे रुग्ण पाठविण्याचा नीचपणा तेथील सरकारकडून केला जात आहे. अशातच परदेशांमध्ये लाखावर पाकिस्तानी नागरिक अडकून पडलेले आहेत. या नागरिकांनाही देशात आणण्याचे सौजन्य इम्रान सरकार दाखवत नाहीय. भारतामध्ये वैद्यकीय उपचारांसाठी आलेल्या १८० पाकिस्तानी नागरिकांनाही पाकिस्तानने वाऱ्यावर सोडले आहे. यावर पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताकडेच मदत करण्याची विनवणी केली आहे.
यामुळे भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने माणुसकीच्या नात्यातून या लोकांना मदत करण्याची तयारी सुरु केली आहे. एकीकडे पाकिस्तान सीमेपलिकडून दहशतवाद्यांची घुरखोरी करत आहे. गेल्याच आठवड्यात पाच दहशतवाद्यांना ठार करण्यात आले होते. यामध्ये ५ भारतीय पॅरा ट्रूपर्सही होते. एवढे असूनही भारत पाकिस्तानची मदत करत आहे. पाकिस्तानी उच्चायुक्तांनी भारताला सांगितले आहे की, अडकलेले नागरिक पाकिस्तानात येऊ पाहत आहेत. सुत्रांनी सांगितले की, आम्हाला पाकिस्तानी उच्चायोगाकडून माहिती मिळाली आहे की त्यांचे १८० नागरिक आजही भारतात आहेत. त्याना माघारी यायचे आहे. संबंधित अधिकाऱ्यांसोबत त्यांच्या परत जाण्यासाठी चर्चा सुरू असून गेल्या महिन्यात पाच पाकिस्तानी नागरिक अटारी-वाघा सीमेवरून पाकिस्तानात पोहोचले होते.