नवी दिल्ली : सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने रेल्वे स्थानकावर पोहोचण्यासाठी प्रवाशांना रणरणत्या उन्हात पायी चालत निघावे लागले. दिल्लीतून देशाच्या विविध भागांत रेल्वे सुरू झाली. केवळ ई तिकीट विक्री झाली. तिकीट असलेल्यांनाच रेल्वेस्थानकात प्रवेश देण्यात आला. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्नच नव्हता.मात्र, दुपारी तीन वाजता रेल्वे गाडी होती तरी सकाळी सात वाजताच अनेक जण स्थानकावर पोहोचले. सायंकाळी सुटणारी रेल्वे गाडी पकडण्यासाठी प्रवाशांना दहा ते बारा तास आधीच घरातून निघावे लागले. दुर्दैवाने सार्वजनिक वाहतूक , खासगी कॅब उपलब्ध नसल्याने हाच पर्याय त्यांच्यासमोर होता.नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर केवळ पहारगंज गेटच्या दिशेने प्रवेश देण्यात आला. त्यामुळे अजमेरी गेटजवळ राहणाऱ्यांनादेखील विरुद्ध दिशेने यावे लागले.खासगी टॅक्सीचालकांनी रेल्वे स्थानकावर पोहोचवण्यासाठी १ ते २ हजार रुपये घेतले. तोही आर्थिक भुर्दंड प्रवाशांना सहन करावा लागला. वाहतूक देखील वळवण्यात आली होती. कॅनॉट प्लेस सर्कलजवळ प्रत्येक ाची चौकशी करण्यात येत होती. ज्यांच्याकडे तिकीट होते त्यांनाच प्रवेश देण्यात आला. डोक्यावर सावली नसल्याने अनेकांना मात्र रांगेत उन्हात थांबण्याशिवाय पर्याय नव्हता. रेल्वे स्थानकात प्रवेश करण्याआधी तापमान तपासण्यात आले. रेल्वे स्थानकात प्रवेश दिल्यावरही फलाटावर कुणालाच फिरू देण्यात येत नव्हते. रेल्वे पोलीस दलाचे महासंचालक अरुणकुमार, रेल्वे बोर्डाचे सदस्य व्ही. के. यादवदेखील यावेळी उपस्थित होते. यादव स्वत: लोकांना आरोग्य सेतू अॅप डाऊनलोड करण्याची सूचना देताना दिसले.
coronavirus: रेल्वेस्थानकावर जाणाऱ्या प्रवाशांची चालकांकडून लूट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:35 AM