नवी दिल्ली - देशातील कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली असून रुग्णांची संख्या चार कोटींवर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत कोरोनाचे 3,275 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 55 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 5,23,975 लोकांना जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे. पंजाबमधील पटियाला येथील नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीमध्ये 60 विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले आले आहेत. यानंतर संपूर्ण विद्यापीठात खळबळ उडाली आहे. विद्यापीठ परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.
विद्यापीठात एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांची कोरोना पॉझिटिव्ह प्रकरणे समोर आल्यानंतर प्रशासनाने विद्यार्थ्यांना 10 मे पर्यंत वसतिगृह रिकामे करण्यास सांगितले आहे, जेणेकरून संसर्ग अधिक पसरण्यापासून रोखता येईल. आरोग्य विभागाच्या वतीने असे सांगण्यात आले आहे की, ज्या विद्यार्थ्यांच्या चाचणी अहवालात कोरोनाची लागण आढळून आली आहे, अशा विद्यार्थ्यांमध्ये व्हायरसची सौम्य लक्षणे आढळून आली आहेत, त्यानंतर सर्व कोरोना पॉझिटिव्ह विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या एका ब्लॉकमध्ये आयसोलेट करण्यात आले आहे.
उत्तराखंडच्या वेलहम गर्ल्स स्कूलमध्ये 16 विद्यार्थिनींचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे, त्यानंतर खळबळ उडाली आहे. अहवालानुसार, वेलहम गर्ल्स स्कूलमध्ये गेल्या एका आठवड्यात 16 विद्यार्थिनी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्या आहेत. डेहराडूनमधील ही शाळा सध्या मायक्रो कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आली आहे
मद्रास आयआयटीमध्ये याआधी अनेक विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. आयआयटी मद्रासने ही माहिती दिली होती. राजधानी दिल्लीतही कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अनेक राज्यांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. याबद्दल घाबरण्याची गरज नाही, फक्त काळजी घेणे आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे,