पाटणा : कोविन पोर्टलवर पाटण्याच्या सिव्हिल सर्जन डॉ. विभा सिंह यांच्या नावाने पाच वेळा लस घेतल्या गेल्यासंदर्भात दोन प्रमाणपत्रे जारी करण्यात आली आहेत. या गंभीर प्रकारानंतर प्रशासन आणि आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. या संदर्भात, डीएम यांनी सिव्हिल सर्जनकडे माहिती मागितली. यावर त्यांनी हे निराधार असल्याचे सांगत, चौकशीचे आदेश दिले. सिव्हिल सर्जन डॉ. विभा सिंह म्हणाल्या, डॉक्टरच नाही, तर कुठल्याही स्तरावरील आरोग्य कर्मचारीही, असे कृत्य करणार नाही. हा कुणी तरी आपली बदनामी करण्यासाठी रचलेला कट आहे. ही चूक कशी झाली याचा तपास केला जाईल. यात जे कोणी दोषी आढळेल, त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल.
कोविन पोर्टलच्या तांत्रिक त्रुटींचा फायदा घेऊन कुणी तरी हा गैरप्रकार केल्याचे सिव्हिल सर्जन विभा यांचे म्हणणे आहे. त्याचे खोटे प्रमाणपत्रही कोविन पोर्टलवर अपलोड करण्यात आले आहे. परंतु कोविन पोर्टलवर लस घेण्यासोबतच पॅन कार्डची कॉपी अपलोड होणे, अवघड आहे. यासंदर्भात, त्यांनी कार्यालयातील एखाद्या कर्मचाऱ्याचाही हात असल्याच्या शक्यतेसंदर्भात इन्कार केलेला नाही.
सोशल मीडियावर पाच वेळा लस घेतल्यासंदर्भातील बातमी दिवसभर व्हायरल झाली. प्रमाणपत्रात आठ दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घेण्याचे म्हटले आहे. पॅन कार्डशी संबंधित पहिल्या प्रमाणपत्रात, सिव्हिल सर्जनने 28 जानेवारी 2021 रोजी कोरोना लसीचा पहिला डोस, तर 17 जून रोजी दुसरा डोस घेतल्याचे म्हटले आहे. आधार कार्डशी संबंधित दुसऱ्या प्रमाणपत्रात 6 फेब्रुवारी 2021 रोजी पहिला, तर 12 मार्च 2022 रोजी दुसरा आणि 13 जानेवारी 2022 रोजी बूस्टर डोस दर्शवला आहे. यावर सिव्हिल सर्जन म्हणाल्या, सुरुवातीच्या टप्प्यात दोन डोसमध्ये 28 दिवसांचे अंतर आवश्यक असताना आठ दिवसांतच दुसरा डोस कसा घेता येईल. त्यांनी इतर लोकांनाही भारत सरकारच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार कोरोना लसीचा डोस घेण्याचे आवाहन केले आहे.
खोडसाळपणा कुणी केला? मोबाईल नंबरवरून होईल उघड -जिल्हा लसीकरण अधिकारी डॉ. एसपी विनायक यांनी सांगितले की, कोविन पोर्टलवर कोणाच्याही नावाने बनावट प्रमाणपत्र काढले जाऊ शकते. जर कोणाकडे पॅनकार्ड किंवा आधार क्रमांक असेल, तर कोणत्याही मोबाइल क्रमांकावर ओटीपी मागवून नोंदणी करता येते. या पद्धतीने, कोणी दुसरी व्यक्तीही डोस घेऊन त्याच्या मोबाईल क्रमांकावर प्रमाणपत्र मागू शकतो. सिव्हिल सर्जनचे दोन क्रमांकाचे प्रमाणपत्र कोणत्या क्रमांकावर मागविण्यात आले, हाही तपासाचा विषय आहे.