नवी दिल्ली - जगभरात वेगाने पसरणाऱ्या कोरोनाचा कहर भारतातही पाहायला मिळत आहे. भारतातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा दिवसागणिक वाढत आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढून 3500 वर पोहोचला आहे. कोरोनाने देशातील 99 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली असून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. कोरोनाचा सर्वाधिक धोका हा 21 ते 40 वर्षे वयोगटातील लोकांना असल्याची माहिती समोर आली आहे.
देशातील कोरोना बाधितांमध्ये 21 ते 40 वर्षे वयोगटातील सर्वाधिक 42 टक्के रूग्ण असल्याची आकडेवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केली आहे. प्रत्येकी 100 पैकी 42 रूग्ण या वयोगटातील आहेत. सर्वात कमी धोका 0 ते 20 वर्षे वयोगटातील लोकांना आहे, असे आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अगरवाल यांनी सांगितले. शुक्रवारी 601 रूग्णांची नोंद झाली. 41 ते 60 वयोगटातील रूग्ण 33 टक्के तर 60 पेक्षा जास्त वय असलेले रूग्ण 17 टक्के आहेत. मृत्यू झालेल्या सर्व रुग्णांना कोणता ना कोणता आजार होता. त्यात प्रामुख्याने मधुमेह, उच्च रक्तदाब, श्वसन विकार, किडनीशी संबधित आजार असल्याचे निष्पन्न झाले, असेही अगरवाल म्हणाले आहेत.
कोरोनाच्या लढ्यासाठी भारत क्षणोक्षणी सुसज्ज होत आहे. गेल्या 15 दिवसांत आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शिकेनुसार विविध राज्यांनी 1 लाख 34 हजार कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे तर 31 हजार निवृत्त, खासगी डॉक्टरांनी स्वयंस्फूर्तीने मदतीची तयारी दाखवली असल्याची माहिती आरोग्य मंत्रालयाच्या वतीने देण्यात आली आहे. तसेच एअर इंडिया व खासगी 97 विमानांच्या मदतीने ईशान्येकडील राज्यांसह संपूर्ण देशभर 190 टन साहित्य पोहोचवण्यात आले. त्यात वैद्यकीय उपकरणे, मास्क, औषधी तसेच व्हेंटीलेटरचा समावेश आहे. रुग्णसंख्या वाढल्यास काय करावे, आरोग्य व्यवस्थापन कसे असेल, यावर प्रशिक्षणात भर देण्यात आला होता, असेही अगरवाल म्हणाले.
कोरोना व्हायरसचा संसर्ग आता जगातील 200 हून देशात झाला आहे. भारतात ही कोरोनाग्रस्तांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. देशभरातील रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू असून अनेक ठिकाणी क्वारंटाईन सेंटर उभारण्यात आले आहेत. भारतातील रुग्णालयात बेडची संख्या कमी आहे. कोरोनाग्रस्तांवर योग्य उपचार करता यावेत यासाठी काही स्टेडियम आणि हॉटेल्सचं रुपांतर हे क्वारंटाईन सेंटरमध्ये करण्यात आले आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! ICU ला असलेल्या कुलूपाने संपवला तिचा जीवनप्रवास
CoronaVirus कोरोनाचे बुमरँग चीनवरच उलटणार; जगासाठी भारत 'बाजीगर' ठरणार
CoronaVirus हाहाकार! जगभरात ११ लाखांहून अधिक रुग्ण; ६२ हजार बळी
CoronaVirus : अमेरिकेत कोरोनाग्रस्तांची संख्या ३ लाखांहून अधिक, दुबईत लॉकडाऊनचा निर्णय