मुंबई : कोरोनापासून बचाव करण्यासाठी वारंवार हात धुणे, नियमित मास्क घालणे, तसेच सुरक्षित अंतर ठेवणे या त्रिसूत्रीचा अवलंब करण्याऐवजी बहुसंख्य नागरिक हे बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या इम्युनिटी पॉवरच्या मागे लागून शारीरिक स्वास्थ्य बिघडवत असल्याचे एका वैद्यकीय निरीक्षणातून दिसून आले आहे. रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी नागरिकांनी वर्षभरात १५ हजार कोटी रुपये खर्च केले असून, या औषधांचा भलताच परिणाम हाेत असल्याने डॉक्टरांची डोकेदुखी वाढली आहे.
याविषयी अधिक माहिती सांगताना फिजिशियन आणि इंटेंसिव्हिस्ट डॉ. प्रदीप शेलार म्हणाले, अनेक रोगप्रतिकारक औषधांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते व या अतिरिक्त साखरेमुळे नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोणतीही औषधे घेण्यापूर्वी शरीरातील अँटिबॉडीजचे प्रमाण तपासणे फार गरजेचे असते; परंतु अनेक नागरिक सोशल मीडियामध्ये येणाऱ्या जाहिरातीच्या भुलभुलैयात येऊन मेडिकल दुकानात सहज उपलब्ध होणाऱ्या गोळ्या तसेच सिरप घेतात.
गेल्या वर्षभरात अनेकांना कोरोनाची बाधा झाली असून, ते कोरोनामुक्तसुद्धा झाले आहेत; परंतु डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय रोगप्रतिकारक औषधे घेतल्यामुळे अनेकांची रक्तशर्करा पातळी घटली आहे. उदाहरणार्थ, खडीसाखर आणि कडुनिंब एकत्र खाल्ले तर रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते अशी पोस्ट जर सोशल मीडियाच्या माध्यमातून आली तर अनेकजण याचा अवलंब करतात; परंतु अनेकवेळा चाळिशी उलटलेल्या नागरिकांना या अतिरिक्त साखरेचा त्रास होतो व त्यांना भविष्यात मधुमेहाची ट्रीटमेंट घ्यावी लागते. अतिरिक्त काढा घेतल्यामुळे अनेकांना मूळव्याधीचा त्रास होण्यास सुरुवात झाली होती व अनेकांना शल्यचिकित्सेला सामोरे जावे लागले होते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतीही औषधे घेऊ नयेतमधुमेह व उच्च रक्तदाब हे आजार घराघरांमध्ये पोहोचले आहेत व हे रुग्ण अनेकदा डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय बाजारातील रोगप्रतिकारक औषधे विकत घेतात. गेल्या वर्षभरात भारतीयांनी १५ हजार कोटींच्या व्हिटॅमिन टॅबलेट, सप्लिमेंट, तसेच अँटिबायोटिक गोळ्या व तत्सम औषधे घेतली आहेत. यामध्ये इम्युनिटी पॉवर वाढविण्याच्या औषधांचा मुख्य समावेश आहे. - डॉ. संजय तारळेकर, हृदय शल्यविशारद