मुंबई: मजुरांना घेऊन जाणाऱ्या श्रमिक विशेष गाड्या पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केली होती. आमच्याकडे मजुरांची यादी तयारी आहे. पण ट्रेनच मिळत नाहीत, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी अप्रत्यक्षपणे केंद्रावर निशाणा साधला. त्याला आता रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. गोयल यांनी गेल्या ३ तासांमध्ये ५ ट्विट्स केली आहेत. राज्यात अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी दररोज ८० रेल्वे गाड्या हव्या आहेत. मात्र आम्हाला केवळ ३० ते ४० गाड्याच दिल्या जात आहेत. आमच्याकडे मजुरांची यादी तयार आहे. पण गाड्याच उपलब्ध करून दिल्या जात नाहीत, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. मुख्यमंत्र्यांच्या या विधानावरून रेल्वेमंत्री पियूष गोयल यांनी पलटवार केला. 'उद्या आम्ही महाराष्ट्राला १२५ श्रमिक विशेष गाड्या देण्यास तयार आहोत. तुमच्याकडे मजुरांची यादी तयार असल्याचं तुम्ही म्हणालात. त्यामुळे गाड्या कुठून सोडायच्या आहेत, रेल्वे गाड्यांनुसार प्रवाशांची यादी, त्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रं आणि रेल्वे कुठे सोडायच्या आहेत, याची माहिती पुढील तासाभरात मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना कळवा,' असं आवाहन गोयल यांनी केलं होतं. मजुरांची आवश्यक माहिती लवकर द्या. त्यामुळे रेल्वे गाड्या रिकाम्या जाणार नाहीत, असा खोचक टोला रेल्वेमंत्र्यांनी ट्विटमधून लगावला. तुम्हाला जितक्या रेल्वे गाड्या हव्या आहेत, तितक्या उपलब्ध करून दिल्या जातील, असंदेखील त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं. यानंतर जवळपास दीड तासानंतर पियूष गोयल यांनी आणखी एक ट्विट केलं. राज्यातील मजुरांसाठी महाराष्ट्र सरकार पूर्ण सहकार्य करेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. यानंतर अर्ध्या तासानं त्यांनी पुन्हा ट्विट केलं. 'अडीच तास होऊन गेले. मात्र तरीही महाराष्ट्र सरकारकडून १२५ गाड्यांसाठी आवश्यक तपशील मिळालेला नाही', असं गोयल यांनी या ट्विटमध्ये म्हटलं आहे.शिवसेना खासदार संजय राऊत यांचं रेल्वेमंत्र्यांना प्रत्युत्तरमहाराष्ट्र सरकारने रेल्वे मंत्रालयास हव्या असलेल्या गाड्यांची यादी सादर केली आहे. पियुषजी, फक्त एक विनंती आहे की ट्रेन ज्या स्टेशनवर पोहोचायला हवी त्याच स्टेशनवर पोहोचू द्यावी, गोरखपूरला सुटलेली ट्रेन ओरिसाला पोहोचू नये, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी रेल्वेमंत्र्याना प्रत्युत्तर दिलं आहे.
उद्धव ठाकरे यांना फडणवीसांचं प्रत्युत्तरस्वत:चं अपयश लपवण्यासाठी वारंवार केंद्र सरकारवर खापर फोडणं, याला काय म्हणायचं? केंद्र सरकार आजही सर्व ती मदत देण्यास तत्पर आहे. सूचनांना राजकारण समजायचं असेल, तर त्यांनी त्याच गैरसमजात रहावं. जनतेच्या वेदनांची परिसीमा होते, तेव्हा विरोधी पक्ष हाच त्यांचा आवाज असतो आणि त्या वेदना दूर होत नाहीत, तोवर संघर्ष करणे, हेच आमचे संस्कार आहेत. आमचा संघर्ष आणि आवाज असाच सुरू राहील, कानावरचे राजकीय पडदे काढायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे!- देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते विधानसभा