नवी दिल्ली : मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिल्लीत प्लाझ्मा बॅँक सुरु केल्यानंतर या बॅँकेत दररोज सरासरी २५ जणांचा प्लाझ्मा जमा होतो. गेल्या आठवडाभरात १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आल्याची माहिती प्लाझ्मा बॅँकेच्या प्रवक्त्या डॉ. मिनू वाजपेयी यांनी लोकमतला दिली.दिल्लीतील आयएलबीएस संस्थेत प्लाझ्मा बॅँक सुरु करण्यात आली आहे. केजरीवालांच्या आवाहनानंतर कोविड-१९ मधून बरे झालेले रुग्ण प्लाझ्मा दान करीत आहे. दात्यांची रोज सरासरी संख्या २५ आहे. एक व्यक्तीच्या प्लाझ्माने दोन रुग्णावर उपचार केले जातात. १०० व्यक्तींचा प्लाझ्मा बॅँकेत शिल्लक आहे. आठवडाभरात दिल्लीतील १०० रुग्णांवर प्लाझ्मा उपचार करण्यात आले आहेत.केजरीवाल यांनी आरोग्य सचिवांना गेल्या दोन आठवड्यांमधील कोरोनामुळे झालेल्या मृत्यूच्या कारणांसंबंधीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात गेल्या दोन दिवसांपासून बाधितांच्या संख्येत घट नोंदवण्यात आली आहे. गेल्या आठवड्यात देशातील कोरोनामुक्तीचा दर २.१ टक्क्यांनी वाढला आहे. बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण हळूहळू कमी होत असला तरी गेल्या काही दिवसांपासून दररोज सरासरी ४०० हून अधिक कोरोनारुग्णांचा मृत्यूची नोंद करण्यात आली.केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी देशभरात सकाळपर्यंत २२ हजार २५२ नवीन कोरोनाबाधित आढळून आले. ४६७ रुग्णांचा कोरोनाने बळी घेतला. १५ हजार ५१५ रुग्णांनी कोरोना संसर्गावर मात मिळवली. देशातील एकूण कोरोनाग्रस्तांची संख्या आता ७ लाख १९ हजार ६६५ वर पोहचली आहे. यातील ४ लाख ३९ हजार ९४८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर, २ लाख ५९ हजार ५५७ रुग्णांवर देशातील विविध रुग्णालयात उपचार सुरु आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत २० हजार १६० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशातील १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ नागरिकांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. यातील २ लाख ६२ हजार ६७९ नागरिकांच्या वैद्यकीय तपासण्या या मंगळवारी करण्यात आल्याची माहिती भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेकडून देण्यात आली आहे. देशातील कोरोनामुक्तीचा दर बुधवारी ६१.५३ टक्के नोंदवण्यात आला.तपासण्या वाढल्या; मृत्यूदरात घटदिल्लीतील कोरोना बाधितांची स्थिती हळूहळू सामान्य होत असल्याचे केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने मान्य केले आहे. गेल्या दहा दिवसांपासून दिल्ली सरकारनेही रुग्णांची संख्या वाढत असली तरी बरे होणाऱ्या रुग्णांच्या टक्केवारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असल्याचे सांगितले. तपासणीची संख्या मोठ्या प्रमाणात वाढविण्यात आली आहे. शिवाय मृत्युदरही घटला आहे.
coronavirus: लढ्यात दिल्लीकर सरसावले; रोज २५ जणांचे प्लाझ्मा दान, दिल्लीतील स्थितीत सुधारणा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2020 3:34 AM