नवी दिल्ली - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, पण अनेक ठिकाणी लोक एकत्र आल्याचे पाहायला मिळाले. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी कोरोनाच्या प्रादुर्भावावरुन पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केलंय. टा
राहुल गांधी यांनी शनिवारी एक ट्विट केलं होतं. यात त्यांनी लिहिले आहे, की कोरोना व्हायरसमुळे छोटे-मध्यमवर्गीय व्यापारी, मजूरांना मोठा फटका बसला आहे. टाळ्या वाजवून त्यांना मदत मिळणार नाही. त्यांना आर्थिक मदतीची आवश्यकता आहे. आता, पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य करताना, कोरोनाचे गांभीर्य सरकारने यापूर्वीच लक्षात घ्यायला हवे होते, ते सरकारने घेतले नाही. आजच्या परिस्थितीचं मला दु:ख वाटतंय, कारण या स्थितीपासून आपण वाचू शकलो असतो. आपल्याजवळ तयारी करण्यासाठी पुरेसा वेळ होता. आपण या समस्येला गंभीरतेनं घ्यायला हवं होतं. त्यानुसार, तयारी करायला हवी होती, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. राहुल गांधी यांनी एका सरकारी महिला डॉक्टरचे ट्विट रिट्विट करत मोदींवर निशाणा साधला.
रोहतक येथील सरकारी महिला डॉक्टर कामना कक्कर यांनी ट्वविट करुन मोदींपुढे आपले गाऱ्हाणे मांडेले होते. जेव्हा ते माझ्या समाधीवर येथील, कृपया त्यांना N९५ मास्क आणि ग्लोव्हज द्या. हो आणि टाळ्या आणि थाळ्याही वाजवा, असे तीव्र संतापजनक ट्विट कामना कक्कर यांनी केलं होत. कामनाच्या या ट्विटला रिट्विट करत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला. पण, हे अकाऊंट फेक असल्याचं अनेकांनी म्हटलं. विशेष म्हणजे याच महिन्यात हे अकाऊंट बनविण्यात आल्याचं ट्विटरवर दिसून येतंय.
दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.