हैदराबाद: कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील महत्त्वाच्या नेत्यांशी चर्चा करणार आहेत. यावरुन एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे. मोदी देशातील सर्व नेत्यांशी चर्चा करणार आहेत. मात्र या चर्चेसाठी मला निमंत्रण देण्यात आलेलं नाही. हा हैदराबाद आणि औरंगाबादचा अपमान असल्याचं ओवेसींनी म्हटलंय.पंतप्रधान मोदींनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंगला ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनला (एआयएमआयएम) आमंत्रित करण्यात आलेलं नाही. हा औरंगाबाद आणि हैदराबादकरांचा अपमान असल्याची टीका ओवेसींनी ट्विटरच्या माध्यमातून केली आहे. 'औरंगाबाद आणि हैदराबादकरांनी एमआयएमला पसंती दिली म्हणजे ते माणूस म्हणून कमी महत्त्वाचे आहेत का? तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष करताय, यामागचं नेमकं कारण काय? आमच्या लोकांच्या व्यथा, मग त्या आर्थिक दृष्टीकोनातून असोत वा मानवतावादी दृष्टीकोनातून, त्या तुमच्यापर्यंत पोहोचवणं हे आमचं काम आहे,' असं ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटलं असून त्यात पंतप्रधान कार्यालयाला टॅगदेखील केलंय.
CoronaVirus: ...हा तर औरंगाबाद आणि हैदराबादच्या जनतेचा अपमान; ओवेसी पंतप्रधान मोदींवर भडकले
By ऑनलाइन लोकमत | Published: April 06, 2020 10:02 AM