नवी दिल्ली - देशातील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे सरकारसमोर गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्यातच लॉकडाऊन, संचारबंदीसारखे उपाय लागू करूनही त्याला लोकांकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशवासियांना संबोधित करणार आहेत. आज रात्री आठ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासीयांशी संवाद साधतील.
आज देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या पाचशेच्यापार पोहोचली आहे. देशातील बहूतांश भागात लॉकडाऊन आणि संचारबंदी असतानाही लोक घराबाहेर पडत आहेत. अशा लोकांना मोदी काय संदेश देतात पाहावे लागेल. तसेच कोरोनामुळे उद्योगधंदे ठप्प झाल्याने अडचणीत आलेली अर्थव्यवस्था आणि आर्थिक संकट यांच्या पार्श्वभूमीवर मोदी काही मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
दरम्यान, रविवारी जनता कर्फ्यूनिमित्त कडकडीत बंद पाळून देशातील जनतेने कोरोधाविरोधात लढण्यास सज्ज असल्याचे दाखवून दिले होते. मात्र जनता कर्फ्यूला एक दिवस उलटतो न उलटतो तोच कोरोनाबाबतचे लोकांमधील गांभीर्य हरवले होते. तसेच लोक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले होते. मुंबईतील काही ठिकाणी वाहतूक कोंडीसारखी परिस्थिती निर्माण झाली. दरम्यान, या प्रकारामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी संतप्त झाले होते. लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नसल्याचा संताप त्यांनी व्यक्त केला होता. "लोक लॉकडाऊनला गांभीर्याने घेत नाही आहेत. कृपा करून स्वतःला वाचवा, स्वतःच्या कुटुंबाला वाचवा, दिलेल्या आदेशांचे पालन करा. तसेच राज्य सरकारांनीही जनतेकडून नियमांचे पालन करवून घेतले पाहिजे, असे आवाहन मोदींनी केले होते.