नवी दिल्ली - देशात कोरोनाने थैमान घातले आहे. रोजच्या रोज लाखो रुग्ण समोर येत आहेत. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यादरम्यान कोरोनामुळे निर्माण झालेल्या भयावह स्थितीवर दोन्ही देशांच्या राष्ट्र प्रमुखांनी चर्चा केली. (CoronaVirus PM Narendra Modi and Russian president Vladimir Putin talks on phone amid rising corona cases)
राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर, स्वतः पंतप्रधान मोदींनी ट्विट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ते म्हणाले, "माझे मित्र राष्ट्रपती पुतीन यांच्याशी आज चांगली चर्चा झाली. आम्ही कोरोनाचा सामना करण्यासंदर्भात चर्चा केली. कोरोना महामारीविरोधातील लढाईत भारताची मदत केल्याबद्दल मी रशियाचे राष्ट्रपती पुतीन यांचे आभार मानतो."
मोदी म्हणाले, आम्ही विविध क्षेत्रांत द्विपक्षीय सहकार्य, विशेषतः हायड्रोजन इकॉनॉमीसह अंतराळ संशोधन आणि अक्षय ऊर्जा क्षेत्रावर चर्चा केली. स्पुतनिक-V लशीचे सहकार्य कोरोना महामारीविरोधात मानवतेच्या संघर्षात उपयोगी पडेल.
गेल्या 24 तासांत देशभरात 3 लाख 60 हजार 960 नवे रुग्ण - देशात कोरोनाला आळा घालण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करेले जात आहेत. मात्र, तरीही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित सापडतच आहेत. आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, बुधवारी गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाचे 3 लाख 60 हजार 960 नवे रुग्ण आढळले आहेत. याच बरोबर एका दिवसात कोरोनामुळे तब्बल 3 हजार 293 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तसेच 2,61,162 लोक कोरोनामुक्तही झाले आहेत. यापूर्वी सोमवारी देशात 323,023 नवे कोरोनाबाधित आढळले होते.