नवी दिल्ली: देशातील लॉकडाऊनचा आढावा घेण्यासाठी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधतील. या बैठकीत मुख्यमंत्र्यांकडून आर्थिक मदतसह परप्रांतीय मजुरांना माघारी पाठवण्याच्या मागवण्याच्या मागण्या केल्या जाऊ शकतात. याशिवाय उद्योगांनादेखील दिलासा देण्याची मागणीदेखील केली जाऊ शकते. देशातील कोरोनाबाधितांचा आकडा २७ हजारांच्या घरात गेला आहे. त्यामुळे या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे.पंतप्रधान कार्यालयातल्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मोदी आज व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांकडून राज्यांमधल्या स्थितीचा आढावा घेतील. देशात लागू असलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्यानं उठवण्याचा केंद्राचा विचार आहे. त्या प्रस्तावावर या बैठकीत चर्चा होईल. राज्यांच्या विविध मागण्या या बैठकीत ऐकल्या जातील. तर मोदी मुख्यमंत्र्यांसोबत रेल्वेची सेवा सुरू करण्यासह मजुरांच्या पलायनाच्या विषयावर चर्चा करतील. यासोबतच उद्योग पुन्हा सेवा करण्याबद्दल, रुग्णालयातल्या सुविधांविषयी मुख्यमंत्र्यांची मतं जाणून घेतील.मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी काल राज्यातल्या जनतेशी संवाद साधताना डाळीचा पुरवठा होत नसल्याचा मुद्दा उपस्थित केला. त्यामुळे मुख्यमंत्री आजच्या बैठकीत हा प्रश्न मोदींकडे मांडतील अशी दाट शक्यता आहे. याशिवाय राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधानांना एक पत्र लिहिलं आहे. कोरोना आणि त्यामुळे लागू असलेल्या लॉकडाऊनमुळे महाराष्ट्राला १.४० लाख कोटी रुपयांचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळे महाराष्ट्राला केंद्रानं आर्थिक पॅकेज देण्यात यावं, अशी मागणी पवारांनी पत्रातून केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री ठाकरे आजच्या बैठकीत पॅकेजच्या मागणीवर जोर देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. इतर राज्यांचे मुख्यमंत्रीदेखील अशाच प्रकारची मागणी करण्याची शक्यता आहे.राज्यांनाही आर्थिक पॅकेज जाहीर करा; शरद पवार यांची केंद्राकडे मागणीकोरोनामुळे महाराष्ट्रासह सहा राज्ये लॉकडाऊन वाढविण्यास सहमत?
CoronaVirus: लॉकडाऊन संपणार की वाढणार?; आजचा दिवस महत्त्वाचा ठरणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2020 8:12 AM