नवी दिल्ली: देशात लागू असलेला ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवत असल्याची मोठी घोषणा पंतप्रधान मोदींनी केली आहे. राज्य सरकारांनी, स्थानिक स्वराज्य संस्थांनी उत्तम काम केलं आहे. प्रत्येकानं जबाबदारी ओळखून योगदान दिलं आहे. मात्र तरीही कोरोना पसरतो आहे. कमीत कमी नुकसान व्हावं, लोकांच्या अडचणी कमी करण्यासाठी राज्यांसोबत चर्चा केली. काही राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतल्याची घोषणा मोदींनी केली आहे. तसेच कोरोनासारख्या महामारीविरुद्ध लढा देण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेला सात गोष्टींचे पालन करण्याचे आवाहन केले आहे.
CoronaVirus: 20 एप्रिलनंतर 'या' ठिकाणचा लॉकडाऊन शिथील होईल, पण...; पंतप्रधानांचे महत्त्वाचे संकेत
कोरोनावर मात करण्यासाठी सात गोष्टींना साथ देण्याचे आवाहन नरेंद्र मोदी यांनी जनतेला केले आहे.
१. नरेंद्र मोदी यांनी घरात असणाऱ्या जेष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याची विनंती केली आहे.
२. लॉकडाऊन आणि सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषेचं काटेकोर पालन करा.
३. नागरिकांनी रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आयुष मंत्रालयद्वारे दिले जाणाऱ्या निर्देशांचे पालन करण्याचे आवाहन नरेंद्र मोदींनी केले आहे.
४. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी 'आरोग्य सेतू' हे मोबाईल अॅप डाऊनलोड करण्याची विनंती नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना केली आहे. तसेच इतरांना देखील हे अॅप घेण्यास प्रेरित करा असं नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे.
५. सभोवताली असणाऱ्या गरिबांना शक्य असल्यास मदत करा. गरिबांच्या जेवणाची जमल्यास व्यवस्था करा अशी विनंती नरेंद्र मोदी यांनी केली आहे.
६ .तुमचा व्यवसाय आणि उद्योगात तुमच्यासोबत काम करत असलेल्या सहकाऱ्यांविषयी सहवेदना ठेवा, त्यांना कामावरुन काढून टाकू नका असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
७. कोरोनाविरुद्ध लढा देणाऱ्या नर्सेस, डॉक्टर, पोलीस, सफाई कामगार यांचा सन्मान करा असं आवाहन देखील नरेंद्र मोदी यांनी केले आहे.
देशवासियांचे मानले आभार'सर्व देशवासियांच्या त्यागामुळे भारताने आतापर्यंत कोरोनाशी अत्यंत मजबुतीने दोन हात केले आहेत, मोठं नुकसान टाळलं आहे. जनतेने त्रास सहन करुन आपल्या देशाला वाचवलं आहे. अनेकांना त्रास सहन करावा लागला, कुणाला खाण्याची अडचण, कुणाला जाण्या-येण्याची अडचण, काही जण घरापासून दूर आहेत. पण प्रत्येक जण आपलं कर्तव्य पार पाडत आहे. सर्वांना आदरपूर्वक नमन करतो. आपल्या संविधानात आम्ही भारतीय लोक याचा उल्लेख आहे, ती हिच गोष्ट आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण या सामूहिक शक्तीचा संकल्प ही खरी आदरांजली आहे', असं म्हणत मोदींनी आदरांजलीही वाहिली.