नवी दिल्ली: देशातील कोरोना बाधितांचा आकडा ५६ लाखांच्या पुढे गेला आहे. दररोज जवळपास ९० हजार कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. देशातील ७ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कोरोना बाधितांची संख्या सर्वाधिक आहे. त्या पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचादेखील समावेश होता. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून साधण्यात आलेल्या या संवादात मोदींनी नव्या रणनीतीवर भर देण्यास सांगितलं.'सुरुवातीला आपण देशात लॉकडाऊन केला. तो निर्णय अतिशय यशस्वी ठरला. संपूर्ण जगानं त्या निर्णयाचं कौतुक केलं. मात्र आता आपल्याला मायक्रो कन्टेंमेंट झोनवर लक्ष द्यायला हवं. एक-दोन दिवसांचा लोकल लॉकडाऊन केल्यास तो कोरोनाविरुद्धच्या लढाईत किती फायदेशीर ठरू शकतो, याचा विचार राज्यांनी करायला हवा. यामुळे तुमच्या राज्यातल्या आर्थिक व्यवहारांवर किती प्रभाव पडतो, याबद्दलचं मंथन करून निर्णय घ्यायला हवा,' असं मोदींनी सुचवलं.पंतप्रधान मोदींनी मुख्यमंत्र्यांशी संवाद साधताना मास्कच्या वापरावर पुन्हा जोर दिला. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात मास्क फायदेशीर ठरत असल्याचं अनेक संशोधनांमधून समोर आलं आहे. त्यामुळे मास्क वापरणं सवयीचा भाग असायला हवा. अन्यथा आपण कोरोनाशी लढू शकणार नाही, असं मोदींनी म्हटलं.एका राज्यातून दुसऱ्या राज्यातून होणारा पुरवठा बाधित झाल्यास त्याचा परिणाम जनजीवनावर होतो. सध्या काही राज्यांमध्ये ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. देशात ऑक्सिजनचा तुटवडा नाही. राज्यांनी एकमेकांशी चांगला संवाद राखायला हवा. त्यातून संतुलन राखायला हवं, असा सल्ला मोदींनी मुख्यमंत्र्यांना दिला. कोरोना विरुद्धच्या लढाईत देशानं संयम, संवेदना, संवाद आणि सहयोगाची भावना दाखवली आहे. ती कायम राखायला हवी. सामूहिक प्रयत्नांनीच आता आपल्याला आर्थिक आघाडीवरील लढाईदेखील जिंकायची आहे, असं मोदी म्हणाले.