नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे सुरू असलेल्या आंदोलनावर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे. कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या गंभीर धोक्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती पोलीस आणि प्रशासनाने केली होती. मात्र सर्व विरोध झुगारुन देत येथील महिलांनी निर्धाराने हे आंदोलन सुरू ठेवले होते. अखेरीस आज सकाळी दिल्ली पोलिसांनी शाहीनबाग येथे दाखल होत आंदोलकांना घटनास्थळावरून हटवले. तसेच आंदोलकांचे साहित्यही हटवले.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याविरोधात दिल्लीतील शाहीनबाग येथे 15 डिसेंबरपासून आंदोलन सुरू होतो. येथील आंदोलकांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय होते. आंदोलन सुरू झाल्यापासून सरकार आणि आंदोलकांकडून ताठर भूमिका घेण्यात आल्याने हे आंदोलन सुमारे तीन महिन्यांपर्यंत लांबले होते.दरम्यान, देशात कोरोना विषाणूचा प्रसार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शाहीनबाग येथील आंदोलकांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करण्यात आली होती. मात्र आंदोलकांनी ही विनंती धुडकावून लावली होती. मंगळवारी सकाळपासूनच आंदोलन स्थळावर महिलांनी जमण्यास सुरुवात केली होती. अखेरीस पोलिसांनी आंदोलकांना आणि त्यांच्या साहित्यास घटनास्थळावरून हटवले.